MNS: "औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला, मग खासदार MIM चा कसा निवडून येतो?"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 05:10 PM2022-04-29T17:10:18+5:302022-04-29T17:18:53+5:30
राज ठाकरेंची सभा ज्या मैदानावर होत आहे, त्याच मैदानावर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादेतील शिवसेनेची पहिली सभा घेतली होती.
मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. पोलिसांनी एकूण १६ अटी घालत राज ठाकरेंच्या परवानगी दिली. त्यानंतर, मनसेकडून औरंगाबाद येथील मैदानावर सभेची जय्यत तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे हेही आज पुण्यात पोहोचले असून उद्या ते औरंगाबादकडे रवाना होणार आहेत. राजकीय वर्तुळात या सभेची मोठी उत्कंठा आहे. तर, काहींना बाळासाहेबांच्या औरंगाबाद येथील सभेचीही यानिमित्ताने आठवण झाली आहे. त्यातूनच, मनसेचे बाळा नांदगांवकर यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
राज ठाकरेंची सभा ज्या मैदानावर होत आहे, त्याच मैदानावर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादेतील शिवसेनेची पहिली सभा घेतली होती. ही सभा रेकॉर्डब्रेक झाली होती. सध्या, राज यांच्या सभेचीही तशीच चर्चा सुरू असून ही सभा सर्वच सभांचे रेकॉर्ड ब्रेक करेल, अशी चर्चा होत आहे. त्यावर, मनसेनं प्रतिक्रिया दिली आहे. कुठलिही सभा रेकॉर्ड मोडण्यासाठी नसून विचाराचं सोनं वाटण्यासाठी असते, असे त्यांनी म्हटलंय. तसेच, जर औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मग खासदार एमआयएमचा का निवडून येतो, असा सवालही बाळा नांदगांवकर यांनी विचारला आहे. शिवसेना नेत्यांनी औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं म्हटलं होतं. त्यावर, मनसेनं अशी प्रतिक्रिया दिली.
आम्हाला अट जाचक वाटत नाहीत
बाळा नांदगावकर म्हणाले की, पोलिसांनी त्यांचं काम केलं आहे. आम्ही आमचं काम करणार. त्यापलीकडे काही झालं, तर पोलीस त्यांचं काम करण्यासाठी आहेतच. आम्हाला कोणतीही अट जाचक वाटत नाही. कारण पोलीस जेव्हा केव्हा सभा होतात, त्यासाठी अशाच प्रकारे अटी देतात. कदाचित आमच्या सभेसाठी जास्त अटी असतील. पोलिसांना सतर्क राहाणं गरजेचं असतं. त्या दिवशी प्रचंड कार्यक्रम आहेत. त्यामुळे पोलीस काळजी घेत असतील, असंही बाळा नांदगावकर यांनी यावेळी सांगितलं.
सभेसाठी पोलिसांनी काय घातल्या अटी
पोलिसांनी घातलेल्या अटीमध्ये सदर सभा ०१/०५/२०२२ रोजी १६.३० ते २१.४५ या वेळेतच आयोजीत करावी. तसेच कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये, असं सांगण्यात आलं आहे. तसेच सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करु नये, असं म्हटलं आहे. कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगु नये, अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये, अशी तंबीही पोलिसांनी दिली आहे.