MNS Bala Nandgaonkar News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेली प्रत्यक्ष चर्चा, त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपाप्रणित महायुतीत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय लवकरच घेणार आहेत, असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत नेमके काय झाले, याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा होताना, आम्ही त्यांच्याकडे तीन जागा मागितल्या होत्या. त्यावर चर्चा सुरू होती. आता मात्र दोन जागांवर चर्चा सुरू आहे. या जागांवर पक्षप्रमुख राज ठाकरे काय तो निर्णय घेतील, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. यावर पत्रकारांनी कोणत्या जागांवर चर्चा सुरू आहे, प्रश्न विचारला. यावर बोलताना, त्या जागा पक्षप्रमुख राज ठाकरे यांना माहिती आहेत. त्यांनी काही जागा ठरवलेल्या असतील. त्यांना काही खात्री असेल, अशा जागा त्यांनी मागितल्या, असे बाळा नांदगावकर यांनी स्पष्टपणे सांगितले.
मनसे-शिवसेना शिंदे गटाचे विलिनीकरण होणार?
काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना शिंद गटाचे विलिनीकरण होऊन राज ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख होऊ शकतात, अशा जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यावरून काही तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यासंदर्भात बाळा नांदगावकर यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना बाळा नांदगावकर म्हणाले की, या केवळ चर्चा आहेत. याची आम्हाला कोणतीही कल्पना नाही. जर असे घडणार असेल, तर त्या त्या प्रमुखांना त्याची कल्पना असेल. अशा गोष्टी आमच्यापर्यंत येतील, तेव्हा जाहीरपणे सांगितल्या जातील, याची आपण खात्री बाळगा, असे बाळा नांदगावकर म्हणाले.
दरम्यान, महायुतीसोबतची बोलणी फिस्कटली किंवा चर्चा अंतिम निर्णयापर्यंत पोहोचली नाही, तर मनसे स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर, आम्ही यापूर्वीही लोकसभा निवडणुका लढल्या आहेत. त्यामुळे यावर पक्षप्रमुख राज ठाकरे निर्णय घेतील, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. तसेच ०९ एप्रिल रोजी होणाऱ्या गुढी पाडवा सभेविषयी बैठकीत चर्चा झाली, अशी माहितीही त्यांनी दिली.