मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु प्रकृती अस्वस्थामुळे राज ठाकरेंचा दौरा काही काळासाठी स्थगित केला गेल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द राज ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली असून, पुण्यातील सभेत यावर सविस्तर भाष्य करणार असल्याचेही म्हटले आहे. यातच राज ठाकरेंनी जर अयोध्या दौऱ्याबाबत आमची मदत मागितली असती तर नक्कीच आम्ही केली असती, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. याला मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी प्रत्युत्तर देत, संजय राऊत तुम्ही आमच्यासोबत अयोध्येला चला, आपोआप सुरक्षा मिळेल. एकटे संजय राऊत पुरेसे आहेत, या शब्दांत बाळा नांदगावकर यांनी पलटवार केला.
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, कारण काय? पुण्यातील सभेत सविस्तर बोलणार
राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा का स्थगित केला, यावर ते २२ तारखेला सविस्तर बोलणार आहेत. राज ठाकरे नेमके काय बोलतात, याबाबत तुमच्याप्रमाणे मीही उत्सुक आहे, असे बाळा नांदगावकर म्हणाले. तसेच राज ठाकरे यांच्या प्रकृतीवर मी बोलणे उचित ठरणार नाही, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर बाळा नांदगावकर प्रसार माध्यमांशी बोलत होते.
सर्वच बाजूने विरोधक बोलतात, २२ तारखेला आम्ही बोलणार
राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर याबाबत राजकीय वर्तुळातून उलटसूलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर, विरोधक टीका करतात, त्यात हरकत काहीच नाही. आम्ही ते धरूनच चाललो आहोत. राजसाहेबांनी अयोध्या दौरा जाहीर केला, तेव्हाही टीका केली. दौऱ्याला गेलो नाही, तरी बोलणार आणि आता दौरा स्थगित केलाय, तेव्हाही बोलणार. यानंतर आता २२ तारखेला आम्हीही बोलणार आहोत, अशी फिरकी बाळा नांदगावकर यांनी यावेळी घेतली.
'...तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती', संजय राऊतांचं मोठं विधान!
संजय राऊत तुम्ही आमच्यासोबत अयोध्येला चला
संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत सुरक्षा पुरवण्यासंदर्भात विधान केले. यावर बोलताना, हो.. तुमच्याकडूनच काय ती सुरक्षा घेणे, तेवढेच बाकी राहिले आहे. त्याची काही आम्हाला आवश्यकता नाही. आम्ही अयोध्या दौरा पुन्हा जाहीर केला की, संजय राऊत यांनाही सांगू. संजय राऊत तुम्ही आमच्यासोबत अयोध्येला चला. तुम्ही आलात म्हणजे आम्हाला सगळी सुरक्षा येईल. एकटेच संजय राऊत पुरेसे होतील, असा खोचक टोला लगावत, महाभारतात संजय होता ना, ते नुसते समोर असले तरी खूप झाले. सुरक्षा आपोआप मिळेल. त्यांना वाईट वाटायची गरज नाही, या शब्दांत बाळा नांदगावकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.
राज ठाकरेंबाबत 'पुतना मावशीचं प्रेम' दाखवू नका, प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना टोला!
दरम्यान, कुणाचा अयोध्या दौरा का रद्द झाला याबाबत आम्हाला काही माहिती नाही. राज ठाकरेंनी जर अयोध्या दौऱ्याबाबत आमची मदत मागितली असती तर नक्कीच आम्ही केली असती. आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा नियोजित वेळेतच होणार आहे. आदित्य ठाकरे ठरलेल्या दिवशीच म्हणजे १५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जातील आणि रामलल्लाचे दर्शन घेतील. पण राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत भाजपने त्यांच्यासोबत असे का केले? या लोकांकडून लहान पक्षांचा असाच वापर केला जातो हे आता तरी यांनी लक्षात घ्यावे, असे संजय राऊत म्हणाले होते.