MNS Bala Nandgaonkar News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे घोषित केल्यानंतर राज्यभरातील मनसैनिक प्रचारात सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. खुद्द राज ठाकरे यांनी महायुतीचे उमेदवार आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभेला संबोधित केले. त्यानंतर आता राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची मोठी जाहीर सभा शिवाजी पार्क येथे होणार आहे. मनसे नेत्यांनी याबाबतची महत्त्वाची माहिती दिली आहे.
१५ ते १७ मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. या आढाव्यात असे दिसून आले की, राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यापासून मनसैनिक प्रामाणिकपणे महायुतीच्या प्रचारात उतरले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, भिवंडी यांसह अनेक ठिकाणचा आढावा घेतला. कार्यकर्ते उत्साहात कामाला लागले आहेत, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. तसेच शिवाजी पार्क मैदानासाठी आम्ही प्रथम अर्ज केला आहे, त्यामुळे मैदानाची परवानगी आम्हालाच मिळणार, असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला.
१७ मे रोजी पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार
पुढे बोलताना बाळा नांदगावकर यांनी महत्त्वाची माहिती दिली. १७ मे रोजी शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्या सभेची तयारी करण्यासाठी एक बैठक घेण्यात आली. राज ठाकरेंची सभा आम्ही नेहमीच घेतो. त्यामुळे त्याची तयारी आम्ही नेहमीच करतो. तरीही कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे लागते. त्यांचे म्हणणे, काही समस्या जाणून घ्याव्या लागतात. अन्य आवश्यक गोष्टी पाहाव्या लागतात. या बैठकीत या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यात आला. १७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा मुंबईतील सर्व उमेदवारांसाठी होईल, असे बाळा नांदगावकर म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांनी पक्ष विलीन करण्यासंदर्भात केलेल्या विधानावर बाळा नांदगावकर यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. प्रादेशिक पक्षांची आवश्यकता प्रत्येक राज्याला महत्त्वाची असते. कारण प्रादेशिक पक्ष त्या त्या राज्याची अस्मिता, त्या त्या राज्याची संस्कृती जपत असतात, त्या त्या राज्याचे जे प्रश्न आहेत, ते मांडण्याचे काम प्रादेशिक पक्ष करत असतात. तो त्यांच्या स्वाभिमानाचा विषय असतो. भाषा संवर्धन, संरक्षणाचा विषय असतो. प्रादेशिक पक्ष जीवंत राहणे काळची गरज आहे. शरद पवार हे फार मोठे व्यक्तिमत्व आहे. मी त्यांच्या विधानाला छेद देत नाही, असे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.