मंदिर उघडण्यावरून महाविकास आघाडी विरुद्ध मनसे, भाजप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:14 AM2021-09-02T04:14:15+5:302021-09-02T04:14:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेत शंखनाद आंदोलन केले, तर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेत शंखनाद आंदोलन केले, तर मनसे लवकरच या मुद्द्यावरून घंटानाद आंदोलन करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच तसा इशारा दिल्याने मंदिरांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सरकार आणि सत्ताधारी महाविकास आघाडीकडून तिसऱ्या लाटेचे कारण पुढे केले जात असले तरी बार, रेस्टाॅरंटमध्ये गर्दी होत नाही का, या भाजप आणि मनसेच्या प्रश्नाचे उत्तर मात्र सत्ताधाऱ्यांकडे नाही.
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधामध्ये मंदिरे, प्रार्थनास्थळांचा समावेश आहे. अद्याप याबाबत सवलत देण्यात आली नाही. पहिल्या लाटेनंतरही मंदिरांबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. स्वतः राज ठाकरे यांनी यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्रही पाठविले होते. दुसऱ्या लाटेनंतर स्थिती काहीशी नियंत्रणात आल्यावर विविध निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, मंदिरे खुली करण्याचा निर्णय झाला नाही. हाॅटेल, बार, पब सुरू झाले. मात्र, नियमावलीसह मंदिर खुली करण्याचा निर्णय झाला नाही. शिवाय, दहीहंडी, गणेशोत्सव, अशा सणांवरही निर्बंध आले. याच मुद्द्यावर भाजप आणि मनसेने सरकारला घेरले आहे.
.......................................
केंद्र आणि राज्य सरकारांच्या टास्क फोर्सने, विविध तज्ज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आणि धोका वर्तविला आहे. मंदिरे भक्तांसाठी उघडायला हवीत, अशीच प्रत्येक भारतीयाची भावना आहे. मात्र, कोरोनाच्या या काळात लोकांचा जीव वाचविणे जास्त महत्त्वाचे आहे. राज्य सरकार योग्यवेळी नियमांसह याबाबतचा निर्णय घेईलच. त्यासाठी वेळ द्यायला हवा. भाजपने या मुद्द्यावर सध्या जी नौटंकी सुरू केली आहे, ती ताबडतोब थांबवायला हवी. महाराष्ट्रात मंदिरे उघडण्याची मागणी भाजप नेते करतात; पण त्यांचे सरकार असलेल्या उत्तराखंडमध्ये चारधामची यात्रा का बंद आहे, याचे उत्तर भाजपवाले देतील का? लोकांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार त्यांनी थांबवावा.
-चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेस कार्याध्यक्ष
........................................
केवळ सरकारलाच समजते अशातला भाग नाही. लोकांनाही आपली जबाबदारी कळते. लोकही काळजी घेत आहेत. त्यामुळे नियमावलीसह सर्व खुले झाले पाहिजे. मंदिरेही उघडायला हवीत. सततच्या निर्बंधांना अर्थ नाही.
-संदीप देशपांडे, मनसे सरचिटणीस
..............................................................
‘आम्ही हिंदूंच्या सणांविरुद्ध नाही’, असा खुलासा मुख्यमंत्र्यांना करावा लागला, यातच सर्व आले. जनता पाहतेय की ठाकरे सरकारने आधी दारूची दुकाने उघडली, मंदिरे अजून बंद आहेत. राज्यातले सत्ताधारी मात्र चोरून मंदिरात दर्शन घेतात. मोहरमला सशर्त परवानगी मिळते आणि दहीहंडीवर सरसकट बंदी येते. शिवसेना खासदार राहुल शेवाळ यांनी सिद्धिविनायकाचे मागील दाराने दर्शन घेतले. मग सर्वसामान्य लोकांनी काय पाप केले आहे? देवावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करू नका आणि मंदिरे कडीकुलुपात ठेवून जनतेचाही अंत पाहू नका.
-अतुल भातखळकर, मुंबई भाजप कार्याध्यक्ष
.................................................
आधी एक बाब लक्षात घ्यायला हवी की, राज्यात सध्या ब्रेक दी चेन सुरू आहे. अघोषित लाॅकडाऊन नाही. शिवाय, मंदिरे बंद आहेत, पूजा-अर्चा होत नाही, या आरोपात काही तथ्य नाही. मंदिरे केवळ भाविकांसाठी बंद आहेत. मंदिरे, बुद्धविहार, चर्च, अशी प्रार्थनास्थळे केवळ भाविकांसाठी बंद आहेत. मात्र, त्या त्या ठिकाणचे पुजारी किंवा संबंधितांकडून दैनंदिन, नियमित पूजा सुरू आहे. मागच्या वेळी टप्प्याटप्प्याने दुकाने, कारखाने, उद्योग, रेल्वे सुरू करण्याचा निर्णय झाला. आताही टास्क फोर्सकडून सूचना, मार्गदर्शक कार्यप्रणाली आल्यानंतर मंदिरे, प्रार्थनास्थळे भाविकांसाठी उघडण्याचा निर्णय घेतला जाईल.
-सचिन अहिर, शिवसेना नेते