मुंबई - ९० च्या दशकात तरुणाईवर आपल्या संगीताची भुरळ घालणाऱ्या संगीतकार नदीम-श्रवण जोडीतील श्रवण राठोड यांनी वयाचा ६६ वर्षी काल रात्री माहीमच्या एस. एल. रहेजा रुग्णालयात कोरोनाशी लढताना अखेरचा श्वास घेतला. कोरोनाचा उपचार दरम्यान त्यांचा एकूण बिल १० लाख झाले होते. श्रवण राठोड यांनी एका खासगी विमा कंपनीकडून स्वतःची आरोग्य विमा पोलिसी काढली असूनही जो पर्यंत पूर्ण बिलाची रक्कम भरत नाही तो पर्यंत त्यांचा मृतदेह नातेवाईकांना देण्यास एस. एल. रहेजा रुग्णालयाने नकार दिला होता.
जर मृतदेह पाहिजे तर पहिले बिलाची संपूर्ण रक्कम भरा असे त्यांच्या परिवारजनांना सांगण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष व माहिम विधानसभेचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सदर बाब लोकमतला सांगितली. किल्लेदार यांनी हॉस्पिटलच्या वरिष्ठांशी आज सकाळी संपर्क साधला. काही तांत्रिक बाबीमुळे काल रात्री मृतदेह देण्यास उशिर झाला झाला होता. श्रवण राठोड यांच्या कुटुंबातील आणि आपल्या संपर्कातील पारिवारिक मित्रांनी सदर बाब आपल्याला आज सकाळी सांगितली. आपल्या सामंजस्य मध्यस्थीने आणि व्यवस्थापनाने संपूर्ण सहकार्य करत अखेर रुग्णालयाने श्रवण राठोड यांचा मृतदेह त्यांच्या परिवाराकडे अखेर आज सकाळी सुपूर्द केला अशी माहिती किल्लेदार यांनी लोकमतला दिली.
अशा सुप्रसिद्ध संगीतकाराच्या कुटुंबीयांसोबत हे होऊ शकते तर सर्व सामान्य जनतेच्या काय हाल होणार हे विचार आपल्याला विचलित करत आहे. अशा कुठल्याही परिवारावर आलेल्या अतिशय संवेदनशील क्षणादरम्यान रुग्णालय असो किंवा दुसरे कुठलेही प्रशासन त्यांनी माणुसकीचा विचार नक्कीच करावा, अशी विनंती किल्लेदार यांनी केली आहे.
याप्रकरणी एस.एल. रहेजा हॉस्पिटलच्यावतीने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. प्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांचे निधन झाल्याने आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दु: खात सहभागी आहोत. शोकाकुल कुटुंबाच्या या कठीण परिस्थितीत आवश्यक असलेल्या समर्थनासाठी कुटुंबियांसमवेत मनापासून सहानुभूती व्यक्त करतो. आम्ही कुटुंबाच्या संपर्कात होतो. आम्ही कुटुंबाला त्रास दिला, मृताला पैसे भरण्यासाठी ठेवल्याचे सर्व खोट्या दाव्यांचे त्यांनी खंडन केले असून सदर वृत्त निराधार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.