मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरेंनी भोंग्याविरुद्ध घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात भोंग्याचा प्रश्न तापला आहे. काही मशिदींनी पुढाकार घेत या मागणीचे स्वागत केले आहे. मात्र, यावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. नुकतंच हनुमान जयंतीदिनी या मुद्द्याचा राजकीय परिणाम झाल्याचे दिसून आले. मनसेनं आता भोंग्यांच्या मुद्द्यानंतर सीसीटीव्हीचा मुद्दा समोर आणला आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मस्जिदीत सीसीटीव्ही आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटविण्यासंदर्भात 3 मे पर्यंचतचा अल्टमेटम दिला आहे. त्यानंतर, राज्य सरकारच्या गृह विभागानेही बैठक घेऊन विनापरवाना आणि नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यानंतर, मुंबई पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील ७२ टक्के मशिदींकडून पहाटे भोंग्यांचा वापर बंद केला असल्याची माहिती समोर आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे, मनसेनं घेतलेल्या या भूमिकेला किंवा मागणीला गंभीरतेनं घेतल्याचं दिसून येत आहे. आता, मनसेनं आणखी एक मागणी केली आहे. भोंग्यानंतर मनसेनं मशिदींमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली आहे.
''जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत, परंतु मस्जिदीत CCTV आहेत का? "सर्वधर्मीय" प्रार्थना स्थळात CCTV यंत्रणा का करू नये?, असा सवाल बाळा नांदगावकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे. तसेच, प्रार्थनास्थळात सीसीटीव्ही बसवल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तर, असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणीच नांदगावकर यांनी केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मेन्शन केलं आहे.
सायबर खाते अलर्ट, सोशल मीडियावर लक्ष
राज्यासह देशातील परिस्थिती पाहता भोंग्यांच्या मुद्द्यावरून समाजकंटकांकडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी अधिक सतर्क होत सोशल मीडियावरील हालचालीवर विशेष लक्ष ठेवले आहे. गेल्या चार महिन्यांत पोलिसांनी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या एकूण १२,८०० आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या, तर २२ खाती बंद केली आहेत. राज्यातील धार्मिक वातावरण सलोख्याचे राहावे यासाठी समाजमाध्यमांवर विशेष लक्ष ठेवले जात असल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाकडून सांगण्यात आले, तर दुसरीकडे, महाराष्ट्रात शांतता राहावी यासाठी महाराष्ट्र एसआयडीचे पथक दिवसाला अशा स्वरूपाच्या ३० ते ३५ पोस्ट डिलीट करत आहेत. राजकीय पक्षांकडून कोणत्याही प्रकारचे वक्तव्य येताच सोशल मीडियावर पोस्टची संख्या वाढू लागते, असेही सायबर पोलिसांच्या निरीक्षणात समोर येत आहे.
वेबसाईटवर अर्ज उपलब्ध
मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत परवानगीचा अर्ज उपलब्ध आहे. ज्याला त्यांचा वापर करायचा असेल, त्याने अर्ज करावा, त्याच्या वापराबाबत तपासणी करून परवानगी देण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.