Join us

शिवसेना भवनासमोर मनसेचा ‘हनुमान चालीसा’चा भोंगा, कारवाईनंतर पोलीस ठाण्यातच जप!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 6:20 AM

मशिदींवरील भोंगे हटविण्याच्या मागणीवरून आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी रविवारी थेट शिवसेना भवनसमोरच हनुमान चालीसाचा भोंगा लावला.

मुंबई :

मशिदींवरील भोंगे हटविण्याच्या मागणीवरून आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी रविवारी थेट शिवसेना भवनसमोरच हनुमान चालीसाचा भोंगा लावला. श्रीराम नवमी उत्सवाचे निमित्त करत मनसेने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लागलीच हा लाऊडस्पीकर जप्त करत मनसे कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले.

शिवसेना भवनसमोर हनुमान चालीसाचा पाठ सुरू झाला. पोलिसांनी टॅक्सीवरील लाऊडस्पीकर जप्त केला. मनसेविभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे विनापरवाना लाऊडस्पीकर लावल्याबद्दल पाच हजारांचा दंड करण्यात आला. तसेच सदर साऊंड सिस्टीमही जप्त करण्यात आले. या पोलीस कारवाईवर मनसे कार्यकर्त्यांनी हरकत घेत पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडून हनुमान चालीसाचा जप सुरू केला.

यासंदर्भात बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, शिवसेना भवन ही काही मशीद नाही, ज्याच्यासमोर हनुमान चालीसा लावली म्हणून कारवाई केली. शिवसेना भवन हे हिंदूंचे पवित्र स्थळ आहे. मग कारवाई का, असा प्रश्न देशपांडे यांनी केला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र मुख्यमंत्री असताना अशा पद्धतीने कारवाई होणे दुर्दैवी आहे. रामनवमीनिमित्त हनुमान चालीसा लावणे गुन्हा आहे का, अशी विचारणाही देशपांडे यांनी केली.संपलेल्या पक्षांवर मी बोलणार नाहीस्टंटबाजीला मी महत्त्व देत नाही आणि संपलेल्या पक्षांवर आपण बोलू इच्छित नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, भगवान श्रीराम आपल्या हृदयात आहेत. आपण जे काही करतोय, ते त्यांच्यामुळेच करत आहोत.- आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री 

लाखांच्या सभा घेऊन दाखवाशिवसेना संपली अशी ओरड काँग्रेसने अनेकदा केली. पण, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला अखेर उभे केलेच. त्यांच्याच परिश्रमाची सत्ताफळे आज मातोश्रीत बसून आदित्य ठाकरे चाखत आहेत. राहिला प्रश्न मनसेचा; तर ‘मातोश्री’तल्या ठाकरेंनी लाखालाखांच्या जाहीर सभा घेऊन दाखवाव्यात. कोण संपलंय, हे त्यांना कळेल.- कीर्तीकुमार शिंदे, सरचिटणीस, मनसे

 

टॅग्स :मनसेराज ठाकरेशिवसेना