मुंबई: मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राज ठाकरे यांची आई आणि बहिणीचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राज ठाकरे उपचारासाठी आता लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.
सध्या राज ठाकरे यांच्यावर डॉ. जलील पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येत आहे. राज ठाकरे यांना कोरोनाची सौम्य लक्षण असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच राज ठाकरेंसह त्यांच्या आई आणि बहिणीला आम्ही मोनोक्लोनल अँटिबॉडी हे औषध दिलं आहे. तीन तासानंतर राज ठाकरे यांना घरी सोडले जाणार असून त्यांना घरीच क्वारंटाईन करणार असल्याची माहिती देखील पारकर यांनी दिली. राज ठाकरे यांच्या कुटुंबातील किंवा घरातील इतर सदस्यांच्या चाचणीविषयी किंवा त्यांच्या अहवालांविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. असे असले तरी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. तर आता लस घेतललेली असूनदेखील त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे पुणे, नाशिक यांच्यासह विविध शहरांचे दौरे करत होते. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील पुण्यात पार पडली होती.
मनसेचे मेळावे रद्द-
मुंबईतील भांडुप येथे शनिवारी, तर रविवारी पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे शाखाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र राज ठाकरे आजारी असल्याने सर्व मेळावे शुक्रवारीच रद्द करण्यात आले होते. दरम्यान, लवकरच हे दोन्ही मेळावे पुन्हा एकदा आयोजित केले जातील, असे मनसेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. मध्यंतरी अयोध्येतील संतमहंतांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेत अयोध्या भेटीची निमंत्रण दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलतात, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.