मुंबई: स्थानिक नागरिकांसह संपूर्ण कोकणातून तीव्र विरोध होत असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प (Nanar Refinery Project) रद्द करण्यात आला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर' रत्नागिरी राजापूर रिफायनरी'सारखा प्रकल्प हातातून गमावणं कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखं नाही, अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना रविवारी पत्र लिहून राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरीबाबत सर्वांगाने विचार करण्याची मागणी केली आहे.
राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्यानंतर राज ठाकरेंनी नाणार प्रकल्पग्रस्तांना आज कृष्णकुंज या निवासस्थानी बोलवले आहे. नाणार प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. मात्र स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर जमीन मालकांचे म्हणणं ऐकण्यासाठी राज ठाकरे या प्रकल्पग्रस्तांना भेटणार आहे.
नाणारमधील जमीन मालकांना राज ठाकरेंनी बैठकीचे निमंत्रण दिले आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. राज ठाकरेंच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. आज सकाळी 11 वाजता ही भेट होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंच्या या भूमिकेवरुन शिवसेना नेते विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. नाणारमध्ये 221 भूमाफियांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांच्यासाठी राज ठाकरे यांनी भूमिका बदलली आहे का?, असा सवाल करत हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी नाणार वासियांसमोर भूमिका मांडावी, असे आव्हान विनायक राऊत यांनी राज ठाकरेंना दिलं होतं. राज ठाकरे यांनी कोकणात येऊन नाणार प्रकल्प येऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. आता त्यांचे मतपरिवर्तन कशासाठी झाले, हे माहित नाही. 221 गुजराती लोकांनी जमिनी खरेदी केल्या त्यांच्या भल्यासाठी ही भूमिका घेतली आहे का? असा सवालही विनायक राऊत यांनी उपस्थित केला होता.
नाणार प्रकल्पावर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील- उदय सामंत
राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्या भूमिकेतून राज ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. नाणार प्रकल्प नको, अशीच स्थानिकांची भूमिका आहे. शिवसेना स्थानिक जनतेसोबत आहे, असे मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी सांगितले. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबतची शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. नाणार प्रकल्पाची गोष्ट शिवसेनेसाठी संपली आहे, असे उदय सामंत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
पत्राद्वारे नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर 'रत्नागिरी राजापूर रिफायनरी' म्हणजेच नाणार सारखा प्रकल्प हातातून गमावणे कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखे नाही, अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे. तसेच, कोकणावर निसर्गाने सौंदर्याची जितकी मुक्त उधळण केली आहे तितकी इतर ठिकाणी फारशी आढळत नाही ह्या विषयी कोणाचंच दुमत असू शकत नाही. प्रत्येक पर्यटन स्थळ हे एखाद्याच विशिष्ट ऋतूत खुलून दिसतं आणि इतर वेळेस ते तितकं मनाला भावत नाही. पण कोकणच्या बाबतीत मात्र निसर्गाने कमाल केली आहे. तिन्ही ऋतूत कोकण सुंदर दिसू शकतं आणि म्हणूनच पर्यटन हा कोकणाचा आणि पर्यायाने माझ्या कोकणी माणसाच्या जगण्याचा श्वास होऊ शकतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, कोकण जितका निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे तितकाच सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आहे आणि नरोत्तमांची खाण आहे. मी माझ्या भाषणात अनेकवेळा ह्याचा उल्लेख केला आहे की 'कोकण किनारपट्टी' असा जर भौगोलिक परिसर बघितला तर ह्या भूमीने ७ भारतरत्नं दिली आहेत. त्यातील ४ तर फक्त एकट्या दापोलीमधील आहेत. पण इतकं असून देखील कोकणी तरुण विषण्ण मनस्थितीत आहे. त्याला नोकरीसाठी, रोजगारासाठी मुंबई-पुण्याची वाट धरावी लागते. खरं तर पर्यटन कोकणाचं भवितव्य बदलू शकतं पण तो विचार नीट झाला नाही. एखादा मोठा प्रकल्प येईल, त्याने भविष्य बदलेल असे आशेचे किरण दिसले खरे पण ते प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत. अशीच एक संधी पुन्हा एकदा चालून आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरंतर सगळेच संदर्भ बदलले आहेत. आपल्या राज्यात, देशात गुंतवणूक यावी ह्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु आहे. मध्यंतरी एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प बेंगळुरूत गेला आणि तो महाराष्ट्रात परत यावा ह्यासाठी महाराष्ट्र सरकारची धडपड सुरु आहे हे मी वाचलं. ही बातमी क्लेशदायक होती. आसपासची राज्यं महाराष्ट्राच्या घशात हात घालून उद्योग पळवून न्यायला टपलेली आहेत. अशा वेळेस महाराष्ट्राने 'रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये. हे महाराष्ट्राला आज परवडणारे नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.