'गणेशोत्सवानंतर महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार'; राज ठाकरे आगमी निवडणुकींसाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 03:09 PM2022-08-23T15:09:45+5:302022-08-23T15:10:01+5:30
राज ठाकरे यांनी आज मुंबई मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई- सध्याचं राजकीय वातावरण राज्यासाठी चांगलं नाही. अडीच वर्षात जे घडलं ते चांगलं नव्हतं. फक्त निवडणुका त्यांच्या डोक्यात आहेत, कोण कुणासोबत आहे, हे कळतच नाही. महाराष्ट्रात जे चाललंय हे सत्तेची आणि आर्थिक अॅडजस्टमेंट आहे. असं विधान मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे यांनी आज मुंबई मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
राज ठाकरेंनी उद्या पुणे दौऱ्यावर जाणार असल्याचं देखील सांगितलं. प्रवास करताना त्रास होतोय का, हे बघतो, असं राज ठाकरेंनी म्हटलं. तसेच गणेशोत्सवानंतर महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती देखील राज ठाकरेंनी यावेळी दिली. तसेच नाशिकमधील वणीला देवीच्या दर्शनालाही जायचं आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
माझे बोलणे, माझे विचार, भूमिका लोकापर्यंत पोहोचवा. जर मनसेच्या पदाधिकाऱ्याने किंवा कार्यकर्त्याने पक्षांतर्गत एकमेकांविरोधात सोशल मीडियावर एकजरी पोस्ट केली तर याद राखा, एकालाही पक्षात ठेवणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. महाराष्ट्राने एवढे सगळे दिले, शिवराय दिले, कवी, लेखक दिले. महाराष्ट्रात आठ भारतरत्न आहेत. यापैकी चार जण हे एकट्या दापोलीतील आहे. तिकडे जाऊन विचारा त्यांचे काही आहे का? पुतळे उभे करून काही होत नाही. आम्हाला त्याचे काही पडलेलेच नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
बाळासाहेबांनी हात पसरले अन् मीठी मारली-
मी बाळासाहेबांना बाहेर पडतोय म्हणून सांगायला गेलो, तेव्हा तिथे मनोहर जोशी होते. ते खोलीच्या बाहेर गेले. बाळासाहेबांनी हात पसरले, मला मीठी मारली आणि मला म्हणाले जा. त्यांना समजले होते. मी दगाफटका करून बाहेर पडलो नाही. तुमच्या विश्वासावर बाहेर पडलो. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. आम्ही जेवढी आंदोलने केलीत, तेवढी कुणीच केली नाहीत आणि यशस्वीही केली नाहीत. माझे भाषण सुरु असताना ठाण्यात खळ्ळकण आवाज आला. त्यानंतर मोबाईल कंपन्यांची पत्रे आली. एका आठवड्याची वेळ दिली, त्यानंतर महाराष्ट्रात मराठीत आवाज ऐकू येऊ लागला, असेही राज ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेही जाणार महाराष्ट्र दौऱ्यावर-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील गडातून होणार असून, जाहीर सभा टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमापाशी होणार आहे. सभेची तारीख जाहीर झाली नसली, तरी गणेशोत्सवानंतर होणाऱ्या या सभेबाबत ठाणेकरांमध्ये उत्सुकता आहे. शिवसेना स्थापना झाल्यानंतर पहिली सत्ता ठाण्याने दिली. त्यामुळे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.