मुंबई: मनसेप्रमुखराज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. या दोन भावांसोबतच दोघांचे कुटुंब देखील यावेळी उपस्थित होते. ठाकरे बंधूंच्या या भेटीमुळे राज्यात पुन्हा एका राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राज ठाकरेंच्या भगिनी जयवंती आणि अभय देशपांडे यांच्या मुलाचा साखरपुडा समारंभ दादरमध्ये झाला. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांमध्ये या कार्यक्रमात चर्चा झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. दोघांनी एकमेकांची विचारपूस केल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरेंची देखील भेट झाली.
महाराष्ट्रात घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींदरम्यान, आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आपापसातील मतभेद विसरून एकत्र येणार असल्याची चर्चांना मध्यतरी पुन्हा जोर धरला होता.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे असे मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सतत वाटत असते. त्यांनी आपल्या इच्छा लपवून ठेवलेल्या नाहीत. वेळोवेळी महाराष्ट्रभर होर्डिंग लावून या इच्छा व्यक्तही झाल्या आहेत. मात्र दोघांमधील मतभेद वेगळ्या टोकाचे आहेत. खासगीत बोलताना दोघांनी ते बोलूनही दाखवले आहेत. उद्धव ठाकरे यांना माझ्या इतका आतून बाहेरून कोणीही ओळखत नाही, अशी प्रतिक्रिया एकदा राज ठाकरे यांनीच दिली होती.