राज ठाकरे चक्क उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 08:09 AM2018-11-12T08:09:43+5:302018-11-12T08:29:42+5:30
उत्तर भारतीयांचं निमंत्रण राज ठाकरेंनी स्वीकारलं
मुंबई: उत्तर भारतीयांवर कायम टीका करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे आता उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. डिसेंबरमध्ये होणाऱ्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचं निमंत्रण राज ठाकरेंना देण्यात आलं होतं. हे निमंत्रण राज ठाकरेंनी स्वीकारलं आहे. 2 डिसेंबर रोजी कांदिवलीच्या भुराभाई हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात राज ठाकरे यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमातून राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधतील. उत्तर भारतीय महापंचायतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.
परप्रांतीयांचे लोंढे, त्यामुळे सोयी-सुविधांवर पडणारा ताण, फेरीवाल्यांच्या समस्या यावरुन राज ठाकरेंनी अनेकदा उत्तर भारतीयांवर टीकास्त्र सोडलं आहे. मनसे स्टाईल राड्याचा फटका आतापर्यंत अनेकदा उत्तर भारतीयांना बसला आहे. मात्र आता राज ठाकरे चक्क उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. 2 डिसेंबरला हा कार्यक्रम कांदिवलीत होणार आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण राज यांना 12 ऑक्टोबरला देण्यात आलं होतं. हे निमंत्रण राज यांनी स्वीकारल्याचं वृत्त 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीनं दिलं आहे.
परप्रांतीयाच्या मुद्यावरुन अनेकदा राज ठाकरे उत्तर भारतीयांवर बरसले आहेत. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा उत्तर भारतीयांना मारहाणदेखील केली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा एक गट गेल्या महिन्यात राज ठाकरेंना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेला होता. त्यावेळी त्यांनी राज यांना डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. 'उत्तर भारतीयांच्या मुद्यावर राज ठाकरेंनी त्यांचे विचार मांडावेत. यामुळे अनेक गैरसमज दूर होतील,' असा विश्वास उत्तर भारतीय महापंचायतीचे सदस्य विनय दुबे यांनी यांनी राज यांना निमंत्रणपत्रिका दिल्यावर व्यक्त केला होता.