मुंबई: मनसेप्रमुखराज ठाकरे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आज एका कार्यक्रमाला हजर होते. मात्र कधीकाळी एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या या दोन नेत्यांनी एकमेकांकडे पाहिलंदेखील नाही. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत संपन्न झालेल्या पुस्तक प्रकाशनाला राज ठाकरे आणि आशिष शेलार यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी राज आणि शेलार यांच्यातील राजकीय दुरावा पाहायला मिळाला. प्रसिद्ध चित्रकार, प्राध्यापक प्रल्हाद धोंड यांच्या धवलरेषा पुस्तकाच्या प्रकाशनाला राज ठाकरे आणि आशिष शेलार उपस्थित होते. धोंड यांच्या पुस्तकाचं आणि त्यांनी काढलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घटान राज यांनी केलं. मात्र यावेळी राज आणि शेलार यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं. एकेकाळी चांगले मित्र असलेल्या या दोन नेत्यांनी कार्यक्रमात एकमेकांकडे पाहिलंही नाही. आशिष शेलार यांनी अनेकदा ट्विटरवरुन राज ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंनी मोदी-शहांना सत्तेतून खेचण्याचं आवाहन केलं होतं. त्यासाठी त्यांनी जाहीर सभादेखील घेतल्या. त्यावेळी आशिष शेलार यांनी 'शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे' अशा शब्दांत राज यांच्यावर शरसंधान साधलं होतं. त्याआधी 2017 मध्ये शिवसेनेनं मनसेचे नगरसेवक फोडल्यावर आशिष शेलार राज यांना भेटण्यासाठी कृष्णकुंजवर गेले होते. मात्र आता या दोन नेत्यांमधील मैत्री संपल्याची चर्चा पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ऐकू आली.
राज ठाकरे, आशिष शेलार एकाच कार्यक्रमाला आले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 9:42 PM