Raj Thackeray New Car: राज ठाकरेंच्या ताफ्यात दोन नव्या आलिशान कार; किंमत किती? लकी नंबर ९ ची नंबरप्लेट पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 10:37 AM2023-02-12T10:37:43+5:302023-02-12T10:40:58+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यात आता दोन नव्या कोऱ्या कारचा समावेश झाला आहे. राज ठाकरे यांनी स्वत:साठी एक कार घेतली आहे.
मुंबई-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यात आता दोन नव्या कोऱ्या कारचा समावेश झाला आहे. राज ठाकरे यांनी स्वत:साठी एक कार घेतली आहे. तर दोन आठवड्यांपूर्वी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासाठी एक कार घेतली होती. शिवतीर्थवर दाखल झालेल्या या दोन नव्या कारबाबत विशेष म्हणजे राज यांनी पहिल्यांदाच आपल्या ताफ्यातील कारसाठी पांढऱ्या रंगाला पसंती दिली आहे. कारण राज ठाकरे यांनी आजवर कधीच पांढऱ्या रंगाची कार वापरली नव्हती. रंग बदलला असला तरी नंबर प्लेटचं वैशिष्ट्य आजही कायम आहे. राज ठाकरे यांच्या लकी नंबर ९ चं त्यांच्या आयुष्यातील महत्व तर सगळ्यांच ठावूक आहे. नव्या कारसाठीही राज यांनी ९ क्रमांकालाच पसंती दिली आहे.
राज ठाकरे यांनी त्यांच्यासाठी टोयोटा कंपनीची लँड क्रूझर घेतली आहे. तर पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासाठी टोयोटा वेल्फायर घेतली आहे. याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या श्वानप्रेमासोबतच त्यांचं कार प्रेमही नेहमी चर्चेचा विषय राहिलं आहे. राज ठाकरेंकडे याआधी मर्सिडीजची सेडान कार आहे. ते नेहमी याच कारनं प्रवास करताना दिसत असतात. पण आता त्यांच्या ताफ्यात लँड क्रूझरचा समावेश झाला आहे.
लकी नंबर ९...
राज ठाकरेंसाठी ९ क्रमांकाचं खूप महत्व राहिलं आहे. ९ नंबर त्यांचा सर्वात लकी नंबर आहे असं म्हणतात. मनसेची स्थापन करण्यासाठी त्यांनी ९ तारखेला पसंती दिली होती. मनसेची स्थापना ९ मार्च २००६ रोजी झाली होती. त्यांच्या कारचा नंबरही आजवर ९ हाच राहिला आहे. राज यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घडामोडी आणि निर्णय हे लकी नंबर ९ च्या दृष्टीनंच घेतले गेल्याचंही पाहायला मिळालं आहे.
किंमत किती?
राज ठाकरेंनी स्वत:साठी घेतलेल्या टोयोटा लँड क्रूझरची किंमत १ कोटी ४७ लाखांपासून सुरु होते. तर शर्मिला ठाकरेंच्या ताफ्यात दाखल झालेल्या टोयोटा वेल्फायरची किंमत ९४ लाखांपासून सुरू होते.