मनसे प्रमुख राज ठाकरे सरड्यासारखा रंग बदलणारे; शिवसेनेची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 04:51 PM2022-09-07T16:51:19+5:302022-09-07T16:52:03+5:30

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अरविंद सावंतांनी टीका केली.

MNS chief Raj Thackeray changing color like a lizard Criticism by Shiv Sena | मनसे प्रमुख राज ठाकरे सरड्यासारखा रंग बदलणारे; शिवसेनेची बोचरी टीका

मनसे प्रमुख राज ठाकरे सरड्यासारखा रंग बदलणारे; शिवसेनेची बोचरी टीका

googlenewsNext

 मुंबई - मागील काही दिवसांपासून राज्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जोरदार चर्चा आहे. भाजपा नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच शिवतीर्थ निवासस्थानी जात राज यांची भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंची मनसे-भाजपा एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे. तर मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांच्या जवळीक पाहता शिवसेनेने राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. 

शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत म्हणाले की, राज ठाकरेंचे आतापर्यंत किती प्रयोग झाले? रोज सरड्यासारखा रंग बदलणारे आणि इव्हेंट मॅनेजमेंट करणारी ही माणसे आहेत. आज मोदींसारखा कारभार नाही, उद्या मोदींच्या राज्यात भ्रष्टाचार, शरद पवारांसारखे नेतृत्व नाही. त्यानंतर शरद पवार भ्रष्टाचारी, रोज विचार बदलतात. त्यामुळे ती आंधी नाही वैगेरे नाही. जनता आंधी निर्माण करू शकते पक्ष नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच देशात संविधानावर घाला घातला जात आहे हे जनतेला कळतंय. देशाच्या घटनेवर घाव घालणारं काम देशात होतंय. भोंग्याबद्दल कुणी दखल घेऊ नये. किरीट सोमय्यांनी जेवढ्यांवर आरोप केले ते आज भाजपात आहे. मग ईडी गप्प का? तपास यंत्रणा गप्प का? नारायण राणे, एकनाथ शिंदे यांच्यावरील ईडी कारवाईचं काय झालं? असा प्रश्न खासदार अरविंद सावंत यांनी विचारला. 

राज ठाकरेंनी केली होती उद्धव ठाकरेंवर टीका
मी शिवसेनेत बंड केले नाही. मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो. मी कुठल्याही दुसऱ्या पक्षात गेलो नाही, यामुळे माझी तुलना बंडखोरांशी करू नये, असे राज ठाकरे म्हणाले होते. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार हे माझे जुने सहकारी आहेत. मी माध्यमांतून त्यांचा गट मनसेत विलिन होईल असे ऐकले. या तांत्रिक बाबी आहेत. जर शिंदेंना गरज पडली तर आणि त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर मी त्या ४० आमदारांना मनसेत विलिन करण्याबाबत विचार करेन असे राज ठाकरे म्हणाले होते.

तसेच उद्धव ठाकरेंना २०१४ मध्ये युतीसाठी दोनदा टाळी दिल्याच्या गोष्टींवर राज ठाकरेंना विचारले असता धक्कादायक वक्तव्य राज ठाकरेंनी केले होते. तो माणूस बोलतो वेगळे आणि करतो वेगळे. विश्वास ठेवण्यासारखा नाही. बाकीच्या लोकांचे वाईट वाटते. अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहीत नाही, तेवढा मला माहीत आहे अशा शब्दांत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबाबत आपले मत व्यक्त केले होते. 

Web Title: MNS chief Raj Thackeray changing color like a lizard Criticism by Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.