"...तेव्हा अशी फिल्डिंग लावली होती", पत्रकारांचा गराडा अन् राज ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 05:26 PM2022-05-28T17:26:04+5:302022-05-28T17:28:30+5:30
मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) राज्यात चांगलीच सक्रिय झाली आहे.
मुंबई-
मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) राज्यात चांगलीच सक्रिय झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सभांचा धडाका सुरु करत महाविकास आघाडी सरकाला लक्ष्य करण्या सरुवात केली. तसंच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बैठकांचं सत्र राज यांनी सुरू केलं आहे. याचाच एक भाग म्हणून मनसेनं आज मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. मुंबईतील रंगशारदा सभागृहात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. रंगशारदामध्ये पोहोचल्यानंतर राज ठाकरेंनी माध्यमांचा गराडा पाहून मिश्किल प्रतिक्रिया दिली आणि याचा व्हिडिओ आता व्हायरल होताना दिसत आहे.
पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी कारमधून बाहेर पडताच राज यांनी माध्यमांना पाहून "अजून काय घ्यायचं बाकी आहे का? माझा पाय, बोट वगैरे?", असं विचारलं. त्यानंतर रंगशारदाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रसारमाध्यमांचे एका सरळरेषेत लागलेले कॅमेरे पाहून राज ठाकरे यांनी ऑस्ट्रेलियानं देखील अशीच स्लिपमध्ये फिल्डिंग लावली होती, असं म्हटलं. त्यानंतर एकच हशा पिकला.
VIDEO: "...तेव्हा अशी फिल्डिंग लावली होती", पत्रकारांचा गराडा अन् राज ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया @mnsadhikrutpic.twitter.com/BCR7RVYo77
— Lokmat (@lokmat) May 28, 2022
पुण्यातही माध्यमांवर बरसले होते राज ठाकरे
राज ठाकरे याआधी पुणे दौऱ्यावर असतानाही माध्यमांच्या गराड्याला वैतागले होते. राज ठाकरे पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरीला भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी माध्यमांनी राज ठाकरेंभोवती गराडा केला होता आणि कॅमेरांच्या फ्लॅश लाइट्समुळे ते संतापलेले पाहायला मिळाले होते. जगू द्याल की नाही?, असा सवाल करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. राज ठाकरे यांनी अक्षरधारा बुक गॅलरीत तब्बल दीड तास वेळ व्यतित केला आणि ५० हजार रुपये किमतीची पुस्तकं खरेदी केली होती.
पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन अन् पुढची दिशा ठरली
रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि महिला पदाधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. यावेळी मशिदीवरील भोंग्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल याबाबत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्याचं सांगितलं जात आहे. त्यासोबत आगामी पालिका निवडणुकीबाबतही राज यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.