जीवे मारण्याच्या मिळालेल्या धमकीनंतर राज ठाकरेंनी दिला रुपाली पाटील यांना दिलासा; म्हणाले...
By मुकेश चव्हाण | Published: November 24, 2020 10:02 AM2020-11-24T10:02:07+5:302020-11-24T10:09:36+5:30
जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी रुपाली पाटील यांना फोन करून त्यांची विचारपूस केली.
पुणे/ मुंबई: राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून राष्ट्रवादी, भाजपा, मनसे या राजकीय पक्षांसह सर्वच उमेदवारांचा धूम धडाक्यात प्रचार सुरु आहे. विजयासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. परंतु, याचदरम्यान मनसेच्यापुणे पदवीधरच्या उमेदवार रूपाली पाटील- ठोंबरे यांना सातारा जिल्ह्यातून एका तरुणाने फोन करून 'जिथे असशील तिथे संपवून टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस' अशी धमकी दिल्याने पुण्यात खळबळ उडाली होती. या धमकीबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रुपाली पाटील यांना फोन करून दिलासा दिला आहे.
जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी रुपाली पाटील यांना फोन करून त्यांची विचारपूस केली. तसेच प्रचारासंबंधीची माहितीही घेतली. त्याचप्रमाणे ‘तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो’ असं राज ठाकरे यांनी रुपाली पाटील यांना फोन वरून दिलासा दिला आहे. दरम्यान, यासंदर्भात रूपाली पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोनवरून धमकी मिळाली असून मी असल्या धमक्यांना घाबरत नसल्याचे सांगितले. तसेच यासंदर्भात पुणे पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केले असून फोन करणाऱ्या व्यक्तीस शोधून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही रुपाली पाटील यांनी केली आहे. परंतु, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुद्धा आता धमक्या आणि गुंडगिरीचे सत्र सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाकडून संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसने अरुण लाड आणि मनसेकडून रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे. तसेच पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ६२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे.
पुणे पदवीधर निवडणुकीच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. रुपाली पाटील ठोंबरे ह्यांच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी आणि प्रचारासाठी पुण्यात बैठकांच सत्र सुरु. @Rupalipatiltho1pic.twitter.com/mTtsmKGaFt
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 10, 2020
राष्ट्रवादी, भाजप आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांकडून युद्ध पातळीवर तयारी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख म्हणाले, या निवडणुकीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला देखील मतदानाच्या दिवशी शेवटच्या एक तासात मतदानाच हक्क बजावता येणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या धर्तीवर मतदान केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय पीपीई कीट, सॅनिटायझर, औषध-गोळ्यांची सोय केली जाणार आहे.