राणीच्या बागेत मुंबईचे महापौर 'पिंजऱ्यात', राज ठाकरेंचं व्यंगचित्रातून शरसंधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 01:59 PM2018-11-09T13:59:33+5:302018-11-09T15:30:01+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान राणीच्या बागेत हलवण्याच्या निर्णयावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून उपहासात्मक टीका केली आहे.
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान राणीच्या बागेत हलवण्यात आले. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अधिकृतरीत्या महापौर बंगल्याचा ताबादेखील सोडला आहे. ते आता भायखळ्यातील राणीच्या बागेतील सरकारी बंगल्यात वास्तव्य करत आहेत. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी व्यंगचित्रात राणीच्या बागेत प्राण्यांच्या पिंजऱ्यात मुंबईच्या महापौरांना दाखवलं आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील महापौर निवासाची जागा नुकतीच स्मारक ट्रस्टला हस्तांतरित करण्यात आली. तर मलबार हिलमधील बंगल्याचा हट्ट सोडून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पालिकेच्या बंगल्यात जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर अखेर तयार झाले. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्राद्वारे शिवसेनेला फटकारलं आहे.
व्यगंचित्रातून राज ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा
मुंबईच्या महापौरांचं मूळ निवासस्थान सोडून त्यांना जिजामाता उद्यान (मुंबईचे प्राणीसंग्रहालय) येथे घर देण्यात आले आहे, अशी बातमी आल्याचे राज ठाकरेंनी व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. शिवाय, या चित्रात महापौर प्राण्यांसोबत पिंजऱ्यात दिसत आहेत.
तर दुसरीकडे, आपल्या मुलाला राणीच्या बागेत घेऊन आलेली महिला महापौरांच्या पिंजऱ्याजवळ येताच थांबते आणि मुलाला सांगते,'बाळा, त्यांना खायला घालू नकोस, ते आपल्या मुंबईचे महापैर आहेत'. अशा बोचऱ्या शब्दांत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
(भारतमाता पुन्हा ओवाळणार नाही!; राज ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यंगबाण)
(मुंबईच्या महापौरांचा मुक्काम राणीच्या बागेत; बाळासाहेबांच्या स्मारकासाठी स्थलांतर)
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आता महापौर बंगल्याऐवजी बंगल्याच्या तळघरात (अंडरग्राऊड) होणार आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची कुठलीही तोडफोड किंवा येथील झाडांचीही कत्तल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या महापौर बंगल्याला ऐतिहासिक वारसा असून पुरातत्त्व विभागाकडून 'ब' दर्जा मिळालेला आहे. त्यामुळेच या वास्तूचे जतन करून त्याचे पर्यटनात रुपांतर होईल. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला आहे.
मुंबईतील महापौर बंगल्याची वास्तू 2300 स्वेअर फूट एवढी असल्याने बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यासाठी वास्तूची जागा अपुरी पडते. तर अंडरग्राऊंड परिसर हा तब्बल 9000 स्वेअर फूटांवर पसरलेला आहे. त्यामुळे स्मारकासाठी अंडरग्राऊंड परिसराचा पुरेपूर वापर होईल आणि बंगला परिसरातील लॉन्सही अबाधित राहिल. मुंबई ऐतिहासिक वारसा संवर्धन समितीने नुकतीच महापौर बंगल्याला भेट दिली. त्यावेळी समितीकडून या बंगल्याचे आणि पुतळ्यासंदर्भात घेण्यात आलेल्या नवीन निर्णयाचे कौतुक करण्यात आले. सन 1928 साली हा बंगला बांधण्यात आला होता, त्यानंतर 1962 साली बीएमसीने हा बंगला विकत घेतला. तर डॉ. बीपी. देवगी यांना महापौर म्हणून या बंगल्यात राहण्याचा पहिला मान मिळाला. सन 1964-65 मध्ये या बंगल्याचा महापौरांसाठी अधिकृतपणे वापर करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे ज्या शिवाजी पार्कमधून दसरा मेळाव्याला शिवसैनिकांना संबोधित करायचे, तेथून जवळच हा महापौर बंगला आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी हेच ठिकाण उत्तम असल्याचेही समितीने म्हटले आहे.