Join us

'राज ठाकरेंना निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही, पण...'; शरद पवारांचं महत्वाचं विधान

By मुकेश चव्हाण | Published: December 05, 2020 4:33 PM

लोकमतच्या मुलाखतीत शरद पवार यांना सध्याच्या परिस्थितीनूसार राज ठाकरेंबाबत तुम्ही कसा विचार करता, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

मुंबई: राज्यातील सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवरुन राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'लोकमत'ला दिलेल्या एक्सकॅल्युसिव्ह मुलाखतीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे. १२ डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवारांनी अनेक प्रश्नांची रोखठोक उत्तरे देत अनेक दावे केले आहे. 

लोकमतच्या मुलाखतीत शरद पवार यांना सध्याच्या परिस्थितीनूसार राज ठाकरेंबाबत तुम्ही कसा विचार करता, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे. राज ठाकरे स्वतंत्र्यप्रमाणे आपली मत मांडतात. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या तरुणांचा एक वर्ग आहे. निवडणुकीमध्ये त्यांना हवं तसं यश मिळालं नसेल, मात्र याचा अर्थ तरुणांचा राज ठाकरेंबद्दलचा क्रेज गेला आहे, असं मी मानणार नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. 

मुलाखतीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत विचारण्यात आले असता शरद पवार म्हणाले की, कुठल्याही राजकीय पक्षामध्ये त्याच्या नेतृत्वाची मान्यता पक्षसंघटनेत आणि लोकांमध्ये किती आहे, हे पाहणं आवश्यक असतं. आज काँग्रेसमध्ये रँक अँड फ्रँकची स्थिती लक्षात घेतली तर अजूनही गांधी-नेहरू परिवाराबाबतची आस्था काँग्रेसजनांमध्ये आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी काय किंवा राहुल गांधी काय हे दोघेही त्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत असल्याने पक्षातील बहुसंख्य लोक त्यांच्या विचाराचे आहेत आणि ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. 

यावेळी देश राहुल गांधींचे नेतृत्व मानायला तयार आहे का, अशी विचारणा केली असता शरद पवार म्हणाले की, असे आहे की त्यांच्यामध्ये काही प्रश्न आहेत. त्यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे, असे विधान शरद पवार यांनी केले. तसेच बराक ओबामा यांनीही आपल्या पुस्तकात राहुल गांधींबाबत केलेल्या उल्लेखाबाबतही पवार यांनी प्रतिक्रिया दिली. बराक ओबामा यांनी त्यांची मतं मांडली असतील. पण सगळ्यांची मतं आपण मान्य केली पाहिजेत असं नाही. आपल्या देशातील नेतृत्वाबाबत मी काही बोलेन, पण बाहेरील देशातील नेतृत्वाच्या प्रश्नाबाबत मी फारशी चर्चा करणार नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.

मर्यादा ओलांडली 

आम्ही प्रत्येकाचा दृष्टिकोन स्वीकारायला हवा. आमच्या देशातील नेतृत्वाबाबत आम्ही काहीही म्हणू शकतो; पण दुसऱ्या देशातील नेतृत्वाबाबत बोलणार नाही. मला वाटते की, ओबामा यांनी ही मर्यादा ओलांडली आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले.  

टॅग्स :राज ठाकरेशरद पवारमनसेराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र सरकारकाँग्रेस