Join us

Raj Thackeray: राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 10:59 PM

कोविड डेड सेलमुळे ॲनेस्तेशीया देऊ शकत नसल्याने लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे समजते...

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर १ जून रोजी होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना डेड सेलमुळे ॲनेस्तेशीया देऊ शकत नसल्याने, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. याच शस्त्रक्रियेमुळे राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा लांबवणीवर टाकला होता. खुद्द राज ठाकरे यांनी पुण्याच्या सभेत या शस्त्रक्रियेसंदर्भात माहिती दिली होती.

गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांना पायाच्या दुखण्याचा त्रास सुरू आहे. दरम्यान, राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, पायाचे दुखणे बळावल्याने राज ठाकरे यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया होणार असल्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार, बुधवार १ जून रोजी होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल झाले. राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपल्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली होती. 

राज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया पुढे ढकलली -

टीव्ही ९ ने दिलेल्या वृत्तानुसार, राज ठाकरे लीलावती रुग्णालयात पायाच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले होते. मात्र, तेथे राज ठाकरे यांच्या शरीरात कोरोनाच्या डेड सेल आढळून आल्या. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे लीलावती रुग्णालयातून राज ठाकरे यांना पुन्हा घरी पाठवण्यात आले. यानंतर राज ठाकरे शिवतीर्थावर माघारी आले असून, ते पुढील काही दिवस होम आयसोलेट राहणार असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून, यानंतर शस्त्रक्रियेसंदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत राज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची देशभर चर्चा झाली होती. भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, मगच अयोध्येत पाऊल ठेवावे, अशी ठाम भूमिका घेत आव्हान दिले होते. महाविकास आघाडीतील शिवसेनेसह अन्य पक्षातील नेत्यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र, राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित करत असल्याचे जाहीर केले. यानंतरही राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. पुणे येथे घेतलेल्या सभेत राज ठाकरे यांनी प्रकृतीचे कारण स्पष्ट करतानाच, हा एक सापळा होता, असा मोठा दावाही केला होता. 

टॅग्स :राज ठाकरेमुंबई