राज यांची समयसूचकता...अमित ठाकरेंना दिग्गजांच्या मांदियाळीतून 'कॉर्नर' दाखवला!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 08:33 PM2021-01-23T20:33:10+5:302021-01-23T21:38:00+5:30
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात राज ठाकरे यांच्याकडून समयसूचकता पाहायला मिळाली.
मुंबईत आज दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आलं. कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्यासह इतर दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांच्याकडून समयसूचकता पाहायला मिळाली.
नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडलं. त्यानंतर उपस्थित सर्वच नेत्यांनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं. त्यानंतर उपस्थित सर्व नेत्यांना पुतळ्यासमोर एकत्रित फोटो घेण्यासाठी बोलविण्यात आलं. त्याच वेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यासाठी आले. अमित यांनी पुष्प अर्पण करुन बाळासाहेबांना अभिवादन केलं. त्यानंतर अमित हे राज ठाकरे यांच्या शेजारीच उभे राहिले. पण राज यांनी यावेळी समयसूचकता दाखवून लगेचच त्यांनी अमित यांना तिथून बाजूला जाण्यास खुणावलं. अमित ठाकरे हे देखील क्षणाचाही विलंब न करता तिथून बाजूला झाले आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांच्याबाजूला जाऊन उभे राहिले.
मुंबईतील पहिलाच बाळासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. ९ फूट उंच आणि १२०० किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे.
राज आणि उद्धव यांची भेट
बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने या कार्यक्रमात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर एकत्र पाहायला मिळाले. यावेळी दोघांनीही एकत्रितरित्या बाळासाहेबांचा पुतळा साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांचा सत्कार केला. शशिकांत वडके यांना यावेळी अश्रू अनावर झाले. त्यावेळी ठाकरे बंधूंनी वडके यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं.