मुंबई: निसर्गाशी एकरूप होऊन काव्यलेखन करणारे, बोली भाषेला आपल्या साहित्यात स्थान देऊन ते लोकप्रिय करणारे ज्येष्ठ कवी, लेखक ना. धों. महानोर (वय ८०) यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. पुणे येथील रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मूळ गावी पळसखेडे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. त्यांना किडनीचा त्रास होता. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वाला धक्का बसला आहे. निसर्गकवी, रानकवी म्हणून त्यांना ओळखले जात असत. ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. राज्यातून अनेकजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, ना.धो. महानोर ह्यांचं आज निधन झालं. बहिणाबाई चौधरी आणि बालकवी ह्यांच्या कवितेचा वारसा ना.धो. नी समृद्ध केला. महाराष्ट्राचं निसर्गभान ना.धो. महानोरांनी महाराष्ट्राचं निसर्गभान जागृत केलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. नभ उतरू आलं.’ ‘आम्ही ठाकर ठाकर’ ‘घन ओथंबून येती’, ‘चिंब पावसानं रान झालं’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ ही आणि अशी अनेक ना.धों. महानोरांची गीतं महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. २०१९ ला माझ्या एका भाषणानंतर ना.धो. नी मला एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी जे लिहिलं होतं, ती माझ्या आयुष्यात मला मिळालेली मोठी पोचपावती.ना.धो. महानोरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
नामदेव धोंडो महानोर हे त्यांचं पूर्ण नाव. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडा गावात झाला. तर जळगावात त्यांचं शिक्षण झालं. महाविद्यालयीन शिक्षण सोडून ते शेतीत रमले. त्यांच्या रानातील कवितांनी सर्वांनाच निसर्गाच्या प्रेमात पाडलं. 'दिवेलागणीची वेळ','पळसखेडची गाणी','जगाला प्रेम अर्पावे','गंगा वाहू दे निर्मळ' ही त्यांची लोकप्रिय कवितासंग्रह आहेत. तर 'एक होता विदूषक','जैत रे जैत','सर्जा','अजिंठा' या काही सिनेमांमध्ये त्यांनी गीतरचना केली. महानोर १९७८ साली महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त झाले. तर १९९१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.