'एक फोटो इथे मुद्दाम टाकला...'; बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 11:49 AM2023-12-06T11:49:49+5:302023-12-06T11:54:11+5:30

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केलं आहे.

MNS chief Raj Thackeray has also pay tribute to the memory of Dr Babasaheb Ambedkar. | 'एक फोटो इथे मुद्दाम टाकला...'; बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट

'एक फोटो इथे मुद्दाम टाकला...'; बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७वा महापरिनिर्वाण दिन आहे. देशासह जगभरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री आणि नेते बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आहे. 

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केलं आहे. इतिहासात डोकावून बघताना अगदी मोजकेच महापुरुष आढळतात की त्यांच्यानंतर सुद्धा त्यांचे विचार तळपत राहतात आणि त्यातून बदलाच्या लाटा पुढे अनेक दशकं येत राहतात, ते विचार समाजाला प्रेरित करत राहतात, असं राज ठाकरे म्हणाले. 

महाराष्ट्राचं अहोभाग्य आहे की, छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा ज्योतिबा फुले, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष ह्या भूमीत होऊन गेले. स्वराज्याची मुहूर्तमेढ ह्याच राज्यात झाली, स्त्रीशिक्षणासारखं पवित्र कार्य ह्याच राज्यात आकाराला आलं आणि शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या सहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित - पीडितांचे पुनरुत्थान करणारा महामानव पण ह्याच भूमीतील, असं राज ठाकरेंनी सांगितले.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, हे सगळं आजच्या दिवशी लिहिताना त्यासोबत एक फोटो इथे मुद्दामून टाकला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र असलेला हा फोटो. तीन उत्तुंग कार्य करून गेलेली आणि एकेमकांबद्दल पराकोटीचा आदर असणारी ही माणसं. हा आपला महाराष्ट्र होता. याचा विसर आपल्याला कदाचित पडायला लागला आहे असं वाटावं अशी परिस्थिती आहे. यातून महाराष्ट्राने एकच बोध घ्यावा तो म्हणजे देशाला आकार देणारं, स्वभान देणारं हे राज्य आहे ह्याचं भान गमावू नये, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.

उत्तर आणि दक्षिण अशा संस्कृतींना जोडणारा सांधा म्हणजे महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्राने आपल्या राजकारणाचा, समाजकारणाचा जो चिखल होऊ दिलाय तो वेळीच थांबवावा. कारण महाराष्ट्ररूपी सांधा निखळला आणि आपण पण वाहवत गेलो तर हे फक्त राज्याचं नाही तर देशाचं अपरिमित नुकसान ठरेल. आजचा महापरिनिर्वाण दिन ह्यासाठी महत्वाचा आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून आपल्यातले सगळे भेद गाडून हा देश, हे राज्य पुन्हा एकसंध करण्यासाठी सगळ्यांनी शपथ घेण्याचा हा दिवस असल्याचं राज ठाकरेंनी यावेळी ट्विटद्वारे सांगितले. 

Web Title: MNS chief Raj Thackeray has also pay tribute to the memory of Dr Babasaheb Ambedkar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.