'आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं'; राज ठाकरेंनी केलं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

By मुकेश चव्हाण | Published: December 6, 2022 02:07 PM2022-12-06T14:07:42+5:302022-12-06T14:07:54+5:30

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही ट्विट करत बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे.

MNS chief Raj Thackeray has also tweeted to greet Babasaheb Ambedkar. | 'आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं'; राज ठाकरेंनी केलं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

'आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं'; राज ठाकरेंनी केलं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

googlenewsNext

मुंबई- आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अन्य नेत्यांनीही बाबासाहेब यांना अभिवादन केलं. 

मनसेप्रमुखराज ठाकरे यांनीही ट्विट करत बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. आपण आपल्या महापुरुषांना अत्यंत संकुचित दृष्टिकोनातून पाहतो, मानतो, जगासमोर मांडतो. पण महामानवाच्या महापरिनिर्वाणदिनी आज मला पुन्हा सांगावंसं वाटतं की आपल्या महापुरुषांचं अष्टावधानी कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त अफझल खानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची बोटं छाटणं, आग्र्याहून सुटका, सुरत स्वारी नाही तर त्यांचा राज्यकारभार, कृषी धोरण, राज्य कोष, वास्तू रचना, राज्य व्यवस्था, न्यायदान पद्धत अशी असंख्य गुण वैशिष्ट्य सांगता येतात. तसंच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वालाही अनेक पदर असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.

बाबासाहेबांनी शेकडो वर्ष गुलामगिरीत जगणाऱ्या वंचितांसाठी यशस्वी लढा दिला हे त्यांचं मोठं कार्य आहेच तसंच भारतीय राज्य घटनाकर्ते हा त्यांच्या आणि देशाच्या कारकिर्दीतला  निर्विवादपणे अत्युच्च बिंदू पण त्याव्यतिरिक्तही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते सर्वप्रथम मराठी समाजाला आणि मग विश्वाला कळायलाच हवेत. बाबासाहेब अर्थशास्त्रात उच्च विद्या विभूषित होते. त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये मांडलेल्या ‘दी प्रॉब्लेम ऑफ दी रूपी’ ह्या प्रबंधाच्या प्रेरणेतून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. बालविवाह, बहुपत्नीत्व ह्यामुळे ‘स्त्री’ स्वत्व गमावून बसली होती. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी प्रयत्न केले पण तेव्हा त्यांना विरोध झाला. अखेर भारतीय समाजाने हळूहळू द्विभार्या प्रतिबंधक कायदा स्वीकारल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, वडिलांच्या संपत्तीत लेकीला समान वाटा मिळाला, विवाहाच्या निर्णयात स्वातंत्र्य मिळालं.. त्याचवेळेस हा मानवतावादी कायदा आला असता तर आज चित्र वेगळे असते. असो. बाबासाहेबांनी स्त्रियांना बाळंतपणाची भरपगारी रजा, नारायण लोखंडे ह्यांच्या सहमतीने रविवारी कष्टकऱ्यांसाठी साप्ताहिक सुट्टी, कामाचे १२ वरून ८ तास, कामगार संघटनांना मान्यता, आरोग्य विमा, संपाचा कायदेशीर अधिकार अशा अनेक हक्कांसाठी लढा दिला आणि मान्यता मिळवून घेतली. इतकंच काय तर त्यांचं मराठी भाषेवर असणारं प्रभुत्व अद्भुत होतं आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं. माझ्या आजोबांच्या आवाहनानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी त्यांनी मांडलेली भूमिका ही चळवळीला शक्तिवर्धक ठरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर निष्णात कायदेतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, लेखक आणि स्वातंत्र्योत्तर भारताला लाभलेले द्रष्टे राष्ट्रीय नेते होते. अशा ह्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम, असं राज ठाकरेंनी पोस्टद्वारे म्हटलं आहे.

दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झालं. यामुळे संपूर्ण भारतावर दु:खाचा डोंगर कोसळला. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव अशी ही पदवी देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब  एक लेखक, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक, आणि पत्रकारही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'भारतीय राज्यघटनेचे जनक' म्हणूनही ओळखलं जातं. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय होते ज्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवली. अशा या महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी चैत्यभूमीवर येतात.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: MNS chief Raj Thackeray has also tweeted to greet Babasaheb Ambedkar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.