'बोटं पिरगळली जातील हे बघावं'; राज ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सल्ला, कर्नाटकला इशारा
By मुकेश चव्हाण | Published: December 7, 2022 03:19 PM2022-12-07T15:19:11+5:302022-12-07T15:19:18+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटकाच्या वादावर भाष्य केलं आहे.
मुंबई- महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं, असं म्हणत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कर्नाटकमध्ये झालेल्या घटनेवर भाष्य केलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तात्काळ थांबवण्याचे आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे.
सदर प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला. तसेच येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल कि त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं, असं राज ठाकरे म्हणाले.
संजय राऊतांनी एका दगडात दोन पक्षी मारले; शिंदे गटाला नवीन चिन्हही सुचवले!
अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधंसोपं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावं, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे, आज इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचं हित असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं.
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं. #अखंडमहाराष्ट्रpic.twitter.com/2Rq1XCGGHz
— Raj Thackeray (@RajThackeray) December 7, 2022
दरम्यान, महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांनी मंगळवारचा आपला दौरा रद्द केलेला असताना दुसरीकडे याच मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते बेळगाव येथे दाखल झाल्यामुळे तिथे प्रचंड पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सीमाभागातील टोलनाक्यांवर अडवणूक आणि तपासणी अशा साऱ्या वातावरणात एकंदरच बेळगावचे वातावरण तापलेले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील मराठी माणूसही पेटून उठल्याचे दिसून येते, पुण्यात काही कन्नड बसेसना काळं फासण्यात आलं होतं. दुसरीकडे महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आक्रमक झाले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"