मुंबई: मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आज मुंबई, ठाणे आणि कोकणामधील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात राजकारणाची विचित्र परिस्थिती झाल्याची टीका केली. मी कधीही असं राजकारण पाहिलं नव्हतं, असं राज ठाकरेंनी सांगितले.
जगाच्या पाठीवर महाराष्ट्र एकमेव राज्य असेल की, एकच पक्ष आहे, खरंतर दोन पक्ष त्यातील अर्धा पक्ष सत्तेत आहे, तर अर्धा पक्ष विरोधात आहे, तेही त्याच नावाने. सत्तेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि विरोधातही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आहे, अशी परिस्थिती कधी बघितली आहे का?, हे राज्य म्हणायचं की काय म्हणायचं, असा निशाणा राज ठाकरेंनी साधला. फक्त दिवस ढकलायचे काम सुरु आहे, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.
मी याआधी सांगितलं होतं, की राज्यातील सर्व ब्रिजेसचं ऑडिट व्हायला हवं. मात्र कोणाचं याकडे लक्ष नाही. तुम्ही जगा, मरा, काहीही करा, त्यांना काहीही फरत नाही. फक्त मतदान करा, येवढं फक्त सुरु आहे, असं राज ठाकरे म्हणाले. कोणाला नागरिकांची चिंताच नाही. चिपळूणमध्ये जे फ्लायओव्हरचं बांधकाम कोसळलं. हे काम इगल इन्फ्रा इंडिया या कंपनीला दिले होते. १४० कोटी रुपये मंजूर करुन हे बांधकाम सदर कंपनीला दिले होते. सध्या याच कंपनीकडे मुंबईतील जवळपास ९८० कोटी रुपयांचं काम सुरु आहे, असं राज ठाकरेंनी सांगितले.
लोकांच्या जिवाची कुणालाच पर्वा नाही. ब्रीज बांधताना लोकांची चिंता केली जात नाही. याबाबत कोणी काही बोलायला तयार नाही. संबंधित मंत्री रविंद्र चव्हाण यांचा राजीनामा देखील कोणी मागत नाही. ज्या गोष्टींचा नागरिकांना राग येत नाही, त्याचं काय करायचं?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. राज्यात कायदा नावाची काही गोष्टच उरली नाही. कोणाला काही कडक शासन होईल, याची चिंता नाही. जनतेला देखील राग येत नाही. ज्या काही माझ्या आतमध्ये ज्या धुमसणाऱ्या गोष्टी आहे, त्या योग्यवेळी मी बाहेर काढेन. 'इंजिना'ची वाफ योग्य वेळी बाहेर काढेन, मग यांना कसे चटके बसतील बघा, असा इशारा देखील राज ठाकरेंनी यावेळी दिला.