मुंबई- विधानसभेत विश्वासमत सिद्ध करण्याला अवघे काही तास उरले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आघाडी सरकार कोसळले असून देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्यासोबत बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नवे उपमुख्यमंत्री असतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस हे आपल्याला पाठिंबा असलेल्या आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना गुरुवारी देतील आणि शुक्रवारी (दि.१) फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्यात घडलेल्या या घडामोडींवर पहिल्यांदाच मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होता, असं राज ठाकरे यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.
दरम्यान, आज शिवसैनिकांना नोटीस पाठवली जाते. केंद्रीय सुरक्षा पथक मुंबईत दाखल होतेय. ज्या शिवसैनिकांनी आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला. त्यांच्या रक्ताने तुम्ही मुंबईचे रस्ते लाल करणार आहात का? उद्या कुणीही बंडखोर आमदारांचा रस्ता अडवू नका. नव्या लोकशाहीचा जन्म जल्लोषात झाला पाहिजे. तुमच्या मार्गात कुणीही आडवं येणार नाही. घ्या शपथ, बहुमत चाचणी फक्त डोकी मोजली जाणार आहे. कुणाकडे किती संख्या आहे ते बघणार यात मला रस नाही. माझ्याविरोधात एकही माझा माणूस राहिला तर माझ्यासाठी ते लज्जास्पद आहे असंही उद्धव ठाकरे यांनी बुधवारी लाईव्हमध्ये सांगितले.
सरकार २५ वर्षे टिकेल- देवेंद्र फडणवीस
काल दिवसभरात घडलेल्या अनेक घडामोडी आणि कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर रात्री सुप्रिम कोर्टाने बहुमत चाचणी नियोजित वेळेनुसार घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्यातील जनतेला संबोधित करत उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा पराभव झाला म्हणून आपण उन्माद करायचा नाही, असा सल्ला भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिला. ते म्हणाले की, अडीच वर्षांनंतर स्थापन होणारं सरकार २५ वर्षे टिकेल. या संपूर्ण लढाईत भाजपाच्या आमदारांची भूमिका महत्त्वाची होती. तसेच या संपूर्ण घटनाक्रमात निर्णायक भूमिका घेणाऱ्या शिंदे गटातील आमदारांचेही मी आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.