Join us

नरेंद्र मोदींच्या नकला माझ्यापेक्षा जास्त राज ठाकरेंनी केल्यात; सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 5:18 PM

गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपावर निशाणा साधला आहे.

मुंबई- ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांच्यावर कलम 153 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याने सुषमा अंधारेंवर गुन्हा दाखल झाला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल केल्यामुळं भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. तसेच नारायण राणे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याने विनायक राऊतांवर गुन्हा नोंदविण्यात आलाय. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपावर निशाणा साधला आहे. सत्य मांडणे हा गुन्हा असेल तर हा गुन्हा आम्हाला मान्य आहे. तो आम्ही करणारच, ज्यादिवशी चिन्ह गोठवण्याची बातमी येते. त्यादिवशी महाप्रबोधन यात्रेची सुरुवात होते. त्यामुळे ठाण्यात झालेली गर्दी ही विरोधकांच्या डोळ्यात खुपली असेल, मला नोटीस आली तर पोलीस स्टेशनला हजर होईन. कायदा माझ्या बापानं लिहिला आहे. त्यामुळे त्याचा आदर मी करणार असं शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.

जो कोणी सत्य बोलेल त्याला भीती दाखवली जाते, त्यामुळे धक्का बसण्यासारखं काही नाही. मोदीजींची नक्कल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असेल, तर ती नक्कल नाही. माझ्यापेक्षा जास्त नकला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केल्या आहेत. देशात प्रश्न विचारणे आणि सत्य मांडणे गुन्हा असेल, तर आम्ही गुन्हेगार आहोत, असंही सुषमा अंधारे यांनी सांगितलं.

दरम्यान, चिन्ह गोठवलं, नाव गोठवले एवढं झालं तरी लोक अजिबात खचले नाही. चौपट स्पिरीटनं लोक गर्दी करून जमले. कदाचित ही गर्दी बघून अस्वस्थ होणं. संजय राऊतांचे स्पिरीट आमच्याकडे आहे. ते स्पिरीट घेऊन आम्ही लढणार आहोत. नोटिशीला कायदेशीर उत्तर देऊ. खासदार राजन विचारे, विनायक राऊत, भास्कर जाधव, अनिता बिर्जे आणि मी अशा ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे असं सुषमा अंधारे यांनी सांगितले. 

काय आहे प्रकरण?

ठाण्यात झालेल्या महाप्रबोधन यात्रेत शिवसेना नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली होती. या यात्रेत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, दसरा मेळाव्यातील शिवसैनिकांची गर्दीच साक्ष देते की, आगामी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच असतील. काही लोकांनी दिलेल्या वचनांची आठवण करून देण्यासाठी ही महाप्रबोधन यात्रा आहे, असे त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता म्हणाल्या. गद्दारांनी चिन्ह गोठवले, खुद्दारांचे रक्त पेटवले, ही घोषणा त्यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :राज ठाकरेनरेंद्र मोदीशिवसेनाभाजपा