मुंबई: मनसेने मुंबईत पार पडलेल्या पहिल्या अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सरकारवर नजर शॅडो कॅबिनेटची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे मनसेची शॅडो कॅबिनेट नेमकी कशी असणार आणि यामध्ये कोणत्या नेत्यांची वर्णा लागणार याची उत्सुकता लागली होती. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी आज मुंबईत पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मनसेची शॅडो कॅबिनेट निश्चित झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडीच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेकडून शॅडो कॅबिनेट स्थापन करण्यात येणार आहे. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीनूसार या शॅडो कॅबिनेटमध्ये एकूण 25 ते 28 नेत्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अभिजीत पानसे, अमेय खोपकर, गजानन राणे, दिलीप धोत्रे, योगेळ परुळेकर, संजय नाईक यांच्यासह अन्य नेत्यांची वर्णी लागणार आहे. तसेच आतापर्यत तरी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा या शॅडो या कॅबिनेटमध्ये समावेश नाही. मात्र याबाबत आज उशिरापर्यत याबाबत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.या शॅडो कॅबिनेटची राज ठाकरे सोमवारी होणाऱ्या मनसेच्या वर्धापन दिनी घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मनसेच्या संभाव्य शॅडो कॅबिनेटमध्ये बाळा नांदगावकर यांच्याकडे गृहविभागाची जबाबदारी देण्यात येणार आहे. तर नितीन सरदेसाई वित्त, संदीप देशापांडे नगरविकास, अमेय खोपकर सांस्कृतिक, किल्ले, अभिजीत पानसे शालेय शिक्षण, गजानन राणे कामगार, योगेश परुळेकर सार्वजनिक बांधकाम, दिलीप धोत्रे सहकार, संजय नाईक यांना परिवहन विभागाच्या कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्य सरकारमध्ये गृहविभागाचं खातं मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याकडे आहे. तर नगरविकास या खात्याची जबाबदारी मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तसेच मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्षा गायकवाड यांच्याकडे शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी, सांस्कृतिक विभागाची जबाबदारी मंत्री आणि काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
मनसे आता १४व्या वर्षात पदार्पण करणार असून, ९ मार्चला मनसेचा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. या वर्षी हा वर्धापन दिन नवी मुंबईत साजरा होत आहे. त्या अनुषंगाने मनसेचे सैनिक कामाला लागले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच राज ठाकरे यांनी पक्षाचा वर्धापन दिन नवी मुंबईत घेण्याचे ठरवले आहे.
शॅडो कॅबिनेट म्हणजे काय?
कॅबिनेट हे संसदेला, विधिमंडळाला प्रामुख्याने कनिष्ठ सभागृहाला जबाबदार असले, तरी अंतिमत: ते जनतेला जबाबदार असतात. कॅबिनेट पद्धतीत विरोधी पक्षाला अतिशय महत्त्व असते; कारण पर्यायी पक्ष म्हणून तोच अधिकारावर येण्याची शक्यता असते. विरोधी पक्षाच्या कॅबिनेटला ‘शॅडो कॅबिनेट’ म्हणतात. मंत्र्यांच्या कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या नेत्यांची असते.