मुंबई- सावित्रीबाईफुले यांचे राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा येथे करण्याबाबत राज्य शासन गंभीर आहे. लवकरच त्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल. तसेच या स्मारकासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितले होते. तसेच कालमर्यादेत स्मारक करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
सावित्रीबाईफुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याला सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी भिडे वाड्यातील रहिवाशांची बैठक घ्यावी. आठवडाभरात त्याचा अहवाल सादर करावा आणि कालमर्यादेत स्मारक करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन येत्या दोन महिन्यात करता येईल, या कालमर्यादेत काम करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना सल्ला दिला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ पुण्यातल्या भिडेवाड्यात रोवली, त्या वास्तूचं राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा सरकारने या अधिवेशनात केली, त्याचं स्वागतच. पण अशा घोषणा पुष्कळदा होतात, पण कृती शून्य होते हा पूर्वानुभव आहे. म्हणून माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आही की, अजून एक रखडलेलं स्मारक अशी याची अवस्था होणार नाही याची काळजी घ्या आणि सावित्रीबाईंच्या पुढच्या जयंतीला हे स्मारक तयार असेल हे पहा, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याला सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी भिडे वाड्यातील रहिवाशांची बैठक घ्यावी. आठवडाभरात अहवाल सादर करावा, कालमर्यादेत स्मारक करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, असे आदेश एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले होते.