"...म्हणून इरफानने मनसेचं सदस्यत्व स्वीकारलं असणार"; राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 08:22 PM2020-04-29T20:22:41+5:302020-04-29T20:45:41+5:30

एखादं किडकिडीत व्यक्तिमत्व पण पडदा व्यापून टाकू शकतं, हे इरफानने दाखवून दिलं.

MNS chief Raj Thackeray has paid tributes to actor Irrfan Khan mac | "...म्हणून इरफानने मनसेचं सदस्यत्व स्वीकारलं असणार"; राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

"...म्हणून इरफानने मनसेचं सदस्यत्व स्वीकारलं असणार"; राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

googlenewsNext

मुंबई: दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या बॉलिवूड दिग्गज अभिनेता इरफान खान याचे आज निधन झाले. काल अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफानला कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले  होते. इरफान लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत असताना त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि चाहते शोकसागरात बुडाले. इरफानला मृत्यूनंतर बॉलीवूडसह, क्रिकेटप्रेमी आणि अनेक राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी देखील ट्विटरद्वारे आठवणींना उजाळा देऊन इरफानला आदरांजली वाहिली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, शरीर सौष्ठव, चकचकीत चेहरा, नृत्याचं अंग नसलं तरी पडद्यावर जे अंगविक्षेप केले जातील त्याला नृत्य म्हणणं आणि अतर्क्य दिसणाऱ्या, वागणाऱ्या खलनायकांना संपवण्यासाठी अतर्क्य गोष्टी करणाऱ्या बॉलिवूड मधल्या नायकांचा काळ सुरु असताना इरफान खान सिनेमात भूमिका मिळाव्यात म्हणून धडपडत होता.

त्याची अभिनयाची सहज-सुलभता नसिरुद्दीन शाह, ओम पुरी आणि अजून मागे गेलं तर बलराज सहानी ह्यांच्या पठडीतली. पण ९० च्या दशकात मुळात हिंदी चित्रपट आणि अभिनय ह्यांच्यात फारकत असण्याचा काळ होता. ह्या वावटळीत पण इरफान इथे टिकून राहिला.

पुढे नव्या शतकात सिनेमातले अतर्क्य खलनायक मागे पडले आणि माणसातील उणिवा, महत्त्वाकांक्षा, ह्याही माफक का होईना खलनायकी असू शकतात ह्याची जाणीव नव्या दिग्दर्शकांना होत होती आणि त्यातून इरफानची ‘मकबूलीयत’ सुरु झाली. हिंदी चित्रपटसृष्टीच्या साचेबद्ध यशस्वी नटांच्या पठडीतलं आपल्याकडे काही नव्हतं ह्याची जाणीव इरफानला असावी आणि त्याची उणीव त्याने संवाद फेकीने, डोळ्यातून व्यक्त होण्याच्या ताकदीने भरून काढली. एखादं किडकिडीत व्यक्तिमत्व पण पडदा व्यापून टाकू शकतं, हे इरफानने दाखवून दिलं. सहज अभिनयाची परंपरा हिंदी चित्रपटसृष्टीत इरफानने प्रवाहित ठेवली, असं राज ठाकरेंनी सांगितले.

इरफान लक्षात राहील कारण पडद्यावर तो वावरताना आपल्यातला प्रत्येक माणूस स्वतःला त्याच्याशी एकरूप करू शकायचा. ही एकरूपताच इरफानला दीर्घकाळ स्मरणात ठेवेल. माझ्या पक्षाची चित्रपट शाखा कलाकारांसाठी प्रामाणिकपणे काम करते, हेच इरफानना भावलं असणार आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचा सदस्यत्व स्वीकारलं असणार असं म्हणत राज ठाकरेंनी इरफान खानला श्रद्धांजली अर्पण केली आहे.



Web Title: MNS chief Raj Thackeray has paid tributes to actor Irrfan Khan mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.