Join us

Raj Thackeray: 'त्यांच्या गालावर वळ उठवा'; प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 11:32 AM

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

मुंबई- आज दिवंगत प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आहे. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे एक बहुरंगी व्यक्तिमत्व. संपादक, चळवळीकार, समाजसुधारक, वक्ते, नेते, छायाचित्रकार, टंकलेखक, पटकथा-संवाद लेखक अशी त्यांची ओळख होती. मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी देखील प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त फेसबुक पोस्ट लिहिली आहे. 

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे ह्यांची आज जयंती. ह्या जयंतीनिमित्त आजोबांचं एक दुर्मिळ भाषण, इथे मुद्दामून देत आहे. ते जरूर ऐका. हे भाषण एका 'कृतिशील' विचारवंताच आहे. माझ्या आजोबांचा धर्म ह्या कल्पनेला विरोध नव्हता, उलट ते कमालीचे हिंदू धर्माभिमानी होते. फक्त धर्माच्या नावाखाली चालणारी भोंदूगिरी, फसवेगिरी त्यांना रुचायची नाही, आणि असल्या भोंदूगिरी करणाऱ्यांवर ते हल्ला चढवत. थोडक्यात आख्ख आयुष्य त्यांनी लोकांच्या मनातील धर्माची भीती काढून, धर्माबद्दल आस्था, प्रेम निर्माण व्हावं म्हणून वेचलं, असं राज ठाकरेंनी पोस्टद्वारे सांगितलं.

ह्या भाषणात त्यांनी नाठाळांवर वेळेस रट्टे ओढताना मागे पाहू नका असं आवाहन केलं आहे आणि हे करताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले आहोत हे विसरू नका ह्याची आठवण करून दिली आहे. 'रझाकारी' औलादी डोकं वर काढत आहेत, अनेक ठिकाणी आया-बहिणींची छेड काढत आहेत, ह्या भाषणात आमच्या आजोबांनी जसं म्हणलं आहे तसं त्यांच्या गालावर वळ उठवा. आणि हे करताना मी ह्या पक्षाचा, त्या पक्षाचा असला विचार करायची गरज नाही. कदाचित तुमचे नेते कच खातील, पण तुम्ही खाऊ नका..., असं राज ठाकरे म्हणाले. 

प्रबोधनकारांना अभिवादन करताना एक निर्धार प्रत्येकानेच केला पाहिजे कि, जिथे कुठे अन्याय दिसेल तिथे पेटून उठायचं आणि अन्यायाचा फडशा पाडायचा... हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेमहाराष्ट्र