मुंबई : लाॅकडाऊन आवडे सरकारला, अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. आगामी निवडणुकांसाठीच हा घाट घातला जात आहे. सगळ्यांना बंद करून ठेवायचे. सर्व आखणी झाली, कार्यक्रम झाले, तयारी झाली की आयत्या वेळेला निवडणुका जाहीर करायच्या, असा हा डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
सरकारने दहीहंडीवर घातलेली बंदी, बंद असलेली मंदिरे या पार्श्वभूमीवर राज यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. म्हणजे यांच्यासाठी मंदिरे सुरू, बाकीच्यांनी मंदिरात जायचे नाही. यांनी मेळावे, सभा घ्यायच्या; पण आम्ही दहीहंडी साजरी करायची नाही, असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केला. मंदिरे उघडली गेलीच पाहिजेत, यासाठी सर्व मंदिरांसमोर घंटानाद करू, असा इशारा देताना बाहेर पडायला यांची फाटते यात आमचा काय दोष, असा टोलाही राज यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.