मुंबई: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यांत लॅाकडाउन लागू करण्यात आले. तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रातील जिम व्यवसाय बंद आहे. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नियम व अटींसह अनेक व्यवसाय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. त्या अनुषंगाने जिम व्यवसायही चालू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जिम चालक आणि मालकांनी केली आहे. मात्र तरी देखील सरकारकडून जिम सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जात नाही. याच पार्श्वभूमिवर आज जिमचालकांनी मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी निवास्थानी जाऊन भेट घेतली.
राज ठाकरेंची भेट घेऊन जिम चालकांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. तसेच सर्व नियमांचे पालन करुन जिम व्यवसाय सुरु करण्यासाठी तयार असल्याचे जिम चालकांनी राज ठाकरेंना सांगितले. यानंतर तुम्ही जिम सुरु करा. जिम सुरु केल्यानंतर कोण कारवाई करतंय बघू, असं राज ठाकरेंनी सांगितले. तसेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही माझं बोलणं झालं. त्यांचंही म्हणणं आहे की जिम सुरु झालं पाहिजे. आता मी सांगतोय जिम सुरु करा, ज्याला यायचं आहे, तो जिमला येईल. बघू काय होतंय, असे राज ठाकरे जिम चालक-मालक यांच्या भेटीनंतर म्हणाले.
सचिन पायलट काँग्रेसमध्येच; राहुल गांधींचा 'हा' मराठी विश्वासू चेहरा ठरला हायकमांडचा दुवा
केंद्र सरकार सांगतं जिम सुरु करा, विमानतळ सुरु करायला सांगितलं, राज्य म्हणतं आम्ही नाही करणार, मग तुम्हाला काही वेगळी अक्कल आहे का, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच जिम सुरु केल्यानंतर प्रत्येक जण आपली काळजी घ्या, प्रत्येकाची काळजी घ्या. केंद्राने गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या पाळून काळजी घ्या असे आवाहन देखीर राज ठाकरे यांनी केले आहे.
जिम व्यवसायिकांनी संयमाने सरकारी नियमांचे पालन करून सरकारला सहकार्य केले आहे. परंतु, अनलॉक प्रक्रिया चालू होऊन देखील त्यांची निराशा झाली आहे. विरोधाभास म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरिरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी व्यायाम तितकाच गरजेचा असून त्यासाठी जिम चालू असणे अत्यावश्यक आहे. मात्र, तरीही जिम व्यवसाय बंद आहे, ही मोठी शोकांतिका आहे, असं मत जिम चालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.