हे धंदे यापुढे चालणार नाहीत; राज ठाकरेंची मनसैनिकांना तंबी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 03:47 PM2020-03-09T15:47:41+5:302020-03-09T15:56:35+5:30
जनतेने काम करणाऱ्यांना मतदान दिल्यास नक्कीच सुधारणा घडेल. तसेच मी महाराष्ट्रासाठी बांधील असल्याने आपला लढा सुरूच राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले
नवी मुंबई: मनसेच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्ताने वाशीत मेळावा पार पडला. पहिल्यांदाच मुंबईबाहेर पक्षाचा वर्धापन दिनाचा मेळावा होत असून त्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेचे इतरही नेते उपस्थित होते. वर्धापनदिनानिमित्त पक्षाची शॅडो कॅबिनेट जाहीर करण्यात आली असून यामध्ये कॅबिनेटमधील नेत्यांवर राज्य सकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटची नावे घोषित केली. राज्य सरकारच्या प्रमुख खात्यांवरील चांगल्या वाईट हालचालीवर लक्ष ठेवण्याची संबंधित नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये राज्यभरातील प्रमुख मनसे पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच शॅडो कॅबिनेटमध्ये अमित ठाकरे यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
राज ठाकरेंनी आपल्या भाषणात शॅडो केबिनेटच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे देखील कान खेचले. संबंधित खात्यावर देखरेखीची जबाबदारी मिळाली म्हणजे, आपण मंत्री झालो असे कोणाला वाटू नये असेही त्यांनी सांगितले. पैशाचं खातं मिळाल नाही म्हणून हट्ट देखील करू नये अशी कोपरखळी देखील राज ठाकरेंनी यावेळी मारली.
शॅडो केबिनेटची जबाबदारी सरकारच्या चुकीच्या कामांवर ताशेरे ओढण्याची असेल. यादरम्यान राज्य सरकारच्या चांगल्या कामाचं कौतुक देखील त्यांनी करावं असेही राज ठाकरे यांनी सुचवले. तर आरटीआय टाकून ब्लॅकमेल करण्याचा काहींचा धंदा झाला असून यापुढे असे आरटीआय टाकायचे नाही अशी तंबी देखील राज ठाकरेंनी यावेळी दिली.
महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी काम करणारं हे खातं आहे. सरकारचं वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करू
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 9, 2020
#मनसे_वर्धापनदिन#राज_ठाकरे_लाईव्ह
मनसेच्या पदरी येणाऱ्या अपयशाबाबत देखील त्यांनी आपलं मौन सोडत, मनसे एवढी आंदोलने इतर कोणत्याही पक्षाकडून होत नसल्याचे स्पष्ट केले. परंतु प्रत्येक पक्षात चढ उतार होत असतानाही टीका मात्र मनसेवरच होत असल्याचीही खंतही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
गेल्या १४ वर्षात आपण अनेक कामं केली, तरीही मतदानाच्या वेळेस लोकं कुठे जातात हे कळत नाही, लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत, पण मतदान आम्हाला नाही करणार ह्याला काय अर्थ आहे?
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 9, 2020
#मनसे_वर्धापनदिन#राज_ठाकरे_लाईव्ह
जनतेने काम करणाऱ्यांना मतदान दिल्यास नक्कीच सुधारणा घडेल. तसेच मी महाराष्ट्रासाठी बांधील असल्याने आपला लढा सुरूच राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, आमदार राजू पाटील, अमित ठाकरे आदी नेते उपस्थित होते. बाळा नांदगावकर यांनी देखील मनसेचा वनवास आत्ता संपला असून येणारी निवडणुकीत मनसे आपली ताकद दाखवून देईल असा इशारा विरोधकांना दिला.