Raj Thackeray: 'ट्रेनला काही डबे जोडण्याचं काम सुरुय', राज ठाकरेंचं विदर्भ दौऱ्याआधी सूचक विधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 09:00 AM2022-09-13T09:00:23+5:302022-09-13T09:01:33+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १७ सप्टेंबरपासून विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याआधी मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी एक सूचक विधान केलं आहे.
मुंबई-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १७ सप्टेंबरपासून विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याआधी मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी एक सूचक विधान केलं आहे. सध्या रेल्वेची जुळवाजूळव करतोय. काही डबे मागवलेत, असं मिश्किल विधान राज ठाकरेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केलं. पण राज यांच्या याविधानाचा रोख भाजपासोबतच्या युतीबाबत तर नाही ना? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
"पक्षाच्या अंतर्गत बाबींचा आढावा घेण्यासाठी विदर्भात जातोय. त्यामुळे तुम्हाला फार काही मसाला मिळणार नाही", असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी ट्रेननंच का जाताय? यामागचं काही विशेष कारण आहे का?, असं विचारलं. त्यावर राज ठाकरेंनी मिश्किलपणे सध्या ट्रेनची जुळवाजुळव करतोय. डबे मागवलेत, असं म्हटलं. "मी नेहमीच नागपूरला जाताना ट्रेननेच जातो. जेव्हा नागपूरला जातो तेव्हा ट्रेननेच जातो. चांगला मोठा प्रवास मिळतो म्हणून ट्रेनने जातो", असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला राज्यभरात मोठे खिंडार पडले आहे. यातच आता आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेला अधिकाधिक ठिकाणी शह देण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, आता शिंदे गट आणि मनसेसोबत उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढवण्यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. मनसे आणि भाजप थेट युती होणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
मनसे आणि भाजप थेट युती नाही?
मनसेशी थेटपणे युती करुन त्यांना वेगळ्या जागा सोडणे भाजपला सद्याच्या राजकीय परिस्थितीत शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मनसेशी थेटपणे युती करण्याऐवजी छुप्या सहकार्याची रणनीती भाजपने आखली असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाला ८५ ते ९५ जागा सोडून त्यांनी मनसेच्या वॉर्डातील ताकदीनुसार त्यांना जागा द्यायच्या, असा काहीसा प्लान भाजपचा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.