राज ठाकरेंची महामुलाखत; 'लोकमत'च्या सोहळ्यात मनसे अध्यक्ष देणार 'दिल से' उत्तरं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 06:07 PM2023-04-20T18:07:01+5:302023-04-20T18:10:05+5:30
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यातील अनेक मुलाखती 'सुपरहिट' ठरल्यात. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गेल्या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती.
मराठी, महाराष्ट्र, भूमिपुत्र, हिंदुत्व असे मुद्दे घेऊन राज्याच्या 'नवनिर्माणा'च्या निर्धाराने राजकारणाच्या मैदानात उतरलेले, 'खळ्ळ-खटॅक' स्टाईलने विविध प्रश्नांचा निकाल लावणारे, आपलं वक्तृत्व आणि 'ठाकरी बाणा' या जोरावर लाखोंच्या सभा गाजवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एक महामुलाखत लवकरच होत आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा, असा नावलौकिक मिळवलेल्या, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'च्या रंगमंचावर राज ठाकरे काही टोकदार, तर काही खुमासदार प्रश्नांना सामोरे जाणार आहेत. ही मुलाखत एक खास व्यक्ती घेणार असून या दोघांमधील जुगलबंदी पाहणं रंजक असेल.
२६ एप्रिल २०२३ रोजी वरळीतील एनएससीआय डोममध्ये 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कारां'चा भव्य सोहळा रंगणार आहे. लोकसेवा/समाजसेवा, प्रशासन, राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, क्रीडा या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचा झेंडा देशातच नव्हे तर जगात फडकवणाऱ्या गुणवंतांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रांमधील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांसमोरच राज ठाकरेंची महामुलाखत होईल. त्यातून कोणती 'राज की बात' उघड होते, याबद्दल उत्सुकता आहे. त्यांची मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीचं नाव अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यातील अनेक मुलाखती 'सुपरहिट' ठरल्यात. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गेल्या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती. त्याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाली होती. त्याआधी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी घेतलेली देवेंद्र फडणवीसांची मुलाखत, रितेश देशमुखने घेतलेली देवेंद्र आणि अमृता फडणवीसांची मुलाखतही गाजली होती. त्यामुळे यावेळची राज ठाकरेंची महामुलाखतही एकदम हटके असेल.
या दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार तुम्हीही होऊ शकता. 'लोकमत'च्या काही ऑफिसमध्ये या सोहळ्याचे मोफत पासेस उपलब्ध आहेत. हे पास मिळवण्यासाठी क्लिक करा!