Join us

Raj Thackeray: "राज ठाकरे फक्त 'मराठी हृदयसम्राट'; इतर कोणतीही पदवी लावण्याचे उद्योग करु नये"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 10:27 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड मध्यवर्ती कार्यालयाने हा आदेश जारी केला असून त्याचे तंतोतंत पालन करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

मुंबई - मनसेनं आपला झेंडा बदलल्यानंतर अनेकांनी राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी मुद्द्याकडे लक्ष वेधले. राज ठाकरे हिंदुत्वावादाचा मुद्दा घेऊन आता राजकीय वाटचाल करत असल्याचं अनेकांनी म्हटलं. त्यातच, शिवसेनेनं महाविकास आघाडीत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना हिंदुत्त्वापासून दूर गेल्याची टिका सातत्याने भाजपाकडून होत आहे. दुसरीकडे भाजप आणि मनसेत जवळीकता वाढताना दिसून आली. त्यातच, महापालिका निवडणुकांपूर्वीच सोमवारी मुंबईतील घाटकोपरमध्ये झळलेला राज ठाकरेंचा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला होता.

मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याने घाटकोपरमध्ये हिंदुह्रदयसम्राट असा उल्लेख करत राज ठाकरेंचा बॅनर लावला होता. या बॅनरची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यानंतर पक्षाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. या घटनेची गंभीर दखल मनसेच्या वतीनं घेण्यात आली आहे. घाटकोपरच्या घटनेनंतर मनसेच्या वतीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानूसार, राज ठाकरे यांना केवळ 'मराठी हृदयसम्राट' ही पदवी लावावी, इतर कोणतीही पदवी लावण्याचा उद्योग करु नये असा आदेश पक्षाच्या वतीनं देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड मध्यवर्ती कार्यालयाने हा आदेश जारी केला असून त्याचे तंतोतंत पालन करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

गेल्या अनेक दशकांपासून देशात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढेच हिंदूहृदयसम्राट अशी उपाधी लावली जात होती. भाजपच्याही कुठल्या नेत्याच्या नावापुढे आजवर हिंदूहृदयसम्राट लावण्यात आलं नाही. मात्र, मनसेनं हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर आता त्यांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट लावण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती.

टॅग्स :राज ठाकरेमनसेमराठीमुंबईराजकारण