मुंबई- धार्मिक स्थळांवरुन विशेषत: मशिदींवरुन भोंगे काढण्याबाबत मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्यासह देशभरात वातावरण तापलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारनं धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं राज ठाकरेंनी कौतुक केलं आहे
राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचं मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी आहेत. महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.
राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केल्यानंतर त्याची चर्चा राज्यासह देशभरात होत आहे. या निर्णयाबद्दल आता राज ठाकरे योगींची भेट घेऊन अभिनंदन करणार असल्याची चर्चा आहे. एबीपी माझाच्या वृत्तानूसार, परप्रांतीय विरोधक अशी प्रतिमा पुसण्याचा राज ठाकरेंकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं चित्र आहे. राज ठाकरे हे ५ मे रोजी आयोध्यामध्ये जाणार असून त्या आधी ४ मे रोजी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ही भेट घेऊन राज ठाकरे पुढील राजकारणाबाबत करेक्ट टाइमिंग साधणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी हे लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत. तर, ३५,२२१ ठिकाणी आवाजाच्या मर्यादेतच लाऊडस्पीकर वाजविण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानंतर, पोलिसांनी कारवाई करत बुधवारपर्यंत राज्यातील विविध प्रार्थनास्थळाहून तब्बल १०,९२३ लाऊडस्पीकर काढून घेतले आहेत. एका परिसरातून बाहेर जावा, एवढा आवाज लाऊडस्पीकरमध्ये नसावा, लोकांना या ध्वनीक्षेपकाचा कुठलाही त्रास होता कामा नये, असे योगींनी म्हटले होते.
उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनिश कुमार अवस्थी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार, राज्यातील विविध प्रार्थनास्थळावरील नियमबाह्य लाऊडस्पीकर हटविण्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठीचा आदेश २५ एप्रिल रोजी काढण्यात आला असून ३० एप्रिलपर्यंत अंमलबजावणी करण्याचेही या आदेशात म्हटले आहे.