Join us  

राज ठाकरे पुन्हा 'वर्षा'वर, मुख्यमंत्र्यांसोबत खलबतं; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 1:49 PM

दोन्ही नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने यामागे आगामी निवडणुकांसाठी नवी समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Raj Thackeray Met Eknath Shinde ( Marathi News ) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी राज यांच्यासोबत मनसे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर हेदेखील उपस्थित होते. राज ठाकरे यांनी मराठी पाट्या, टोलनाक्यांवर होणारी अतिरिक्त वसुली आणि बीडीडी चाळ अशा विविध मुद्द्यांवर मागील काही महिन्यांत अनेकदा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे. मात्र आजची भेट नेमक्या कोणत्या कारणासाठी झाली, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

राज ठाकरे हे विविध विकासकामांबाबत आपल्या सूचना मांडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत असतात. मात्र अलीकडील काळात या दोन नेत्यांच्या भेटीगाठी मोठ्या प्रमाणात होत असल्याने यामागे आगामी निवडणुकांसाठी नवी समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. कारण उद्धव ठाकरे यांना आव्हान देत शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची जवळीक आणखीनच वाढली आहे. त्यामुळे या दोघांमधील मैत्रीपूर्ण संबंध निवडणुकीच्या आखाड्यातही दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही महिन्यांत लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. तसंच नंतर राज्यात विधानसभा आण विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीचाही समावेश आहे. या निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांची मनसे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची युती झाल्यास दोन्ही पक्षांसाठी ते फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंपासून वेगळं होताना हिंदुत्त्वाचा मुद्दा पुढे केला होता.  दुसरीकडे, राज ठाकरे हेदेखील सातत्याने आक्रमक हिंदुत्त्वाचा राग आळवत आहेत. त्यामुळे हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर हे दोन्ही नेते एकत्र येण्याचा निर्णय घेत युती करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :राज ठाकरेएकनाथ शिंदेमनसे