लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी ‘ वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोन नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. अधिकृत तपशील समोर आला नसला तरी या दोघांमध्ये राजकीय विषयांसह अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे गटाने आपला उमेदवार दिलेला नाही. येथे मनसेने भाजप उमेदवाराला पाठिंबा द्यावा, याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचे कळते. मात्र, मनसेने आतापर्यंतच्या पोटनिवडणुकीत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे भाजपला पाठिंबा देण्याबाबत राज ठाकरे यांनी तूर्त कोणताही शब्द दिला नसल्याचे समजते. या भेटीच्या वेळी महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. भेटीच्या वेळी वर्षावर शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत उपस्थित होते.
काँग्रेसचे नेतेही भेटीला
मुंबई काँग्रेसचे नेते माजी खासदार मिलिंद देवरा, माजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि आ. अमिन पटेल यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. मात्र, आपल्या मतदार संघातील विकास कामांबाबत शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली, यातून राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्टीकरण तिघांनीही दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"