'देशातील बहुधा ते शेवटचे राजकीय नेते'; प्रकाश सिंग बादल यांना राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

By मुकेश चव्हाण | Published: April 26, 2023 12:48 PM2023-04-26T12:48:08+5:302023-04-26T12:49:53+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही ट्विट करत प्रकाश सिंग बादल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

MNS Chief Raj Thackeray paid tribute to Former Punjab CM Prakash Singh Badal | 'देशातील बहुधा ते शेवटचे राजकीय नेते'; प्रकाश सिंग बादल यांना राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

'देशातील बहुधा ते शेवटचे राजकीय नेते'; प्रकाश सिंग बादल यांना राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

googlenewsNext

मुंबई/दिल्ली: पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंग बादल (९५) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. बादल यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने आठवड्यापूर्वी त्यांना मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास त्यांचे निधन झाले. भटिंडा बादल येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेक राजकीय नेत्यांनी प्रकाश सिंग बादल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही ट्विट करत प्रकाश सिंग बादल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल ह्यांचं निधन झालं. वयाची ७५ वर्ष ते सक्रिय राजकारणात होते, थोडक्यात स्वतंत्र भारताच्या ७५ वर्षांच्या इतिहासातील प्रत्येक क्षणांचे साक्षीदार असणारे ते देशातील बहुधा शेवटचे राजकीय नेते. दीर्घकाळ स्वतः एक पक्ष चालवणं, त्या पक्षाला सत्तेत आणणं, आणि ह्या संपूर्ण काळात स्वतःची विचारधारा घट्ट धरून राहणं हे आत्ताच्या राजकारणात अशक्य वाटणारी कामगिरी त्यांनी लीलया करून दाखवली, असं राज ठाकरेंनी ट्विटरद्वारे म्हटलं.

काही वर्षांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांच्याशी भेटण्याचा योग आला आणि तेंव्हाचा त्यांचा उत्साह थक्क करणारा होता. देशपातळीवर कुठल्याही राजकीय विचारधारांना वडिलकी आणि अनुभवाच्या जोरावर एकत्र आणण्याची क्षमता ठेवणारे नेते मुळातच कमी होत असताना प्रकाशसिंग बादल ह्यांच्यासारख्या नेत्यांची उणीव अधिकच भासेल, असं म्हणत राज ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

दरम्यान, प्रकाशसिंग बादल यांना पंजाबच्या राजकारणातील पितामह असे म्हणतात. बादल हे ५ वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते आणि १० वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या. बादल यांनी १९७० मध्ये पहिल्यांदा राज्याचे १५वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर १९७७मध्ये ते राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. वीस वर्षांनंतर त्यांनी पुन्हा सत्तेची सूत्रे हाती घेतली. मात्र यावेळी भाजपशी त्यांनी केलेल्या युतीचा फायदा त्यांना झाला होता.

Web Title: MNS Chief Raj Thackeray paid tribute to Former Punjab CM Prakash Singh Badal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.