Raj Thackeray: परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब; राज ठाकरेंनी उपस्थित केले १० महत्त्वाचे मुद्दे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 12:39 PM2021-03-21T12:39:25+5:302021-03-21T12:40:31+5:30
mns chief Raj Thackeray raises important questions over mukesh ambani security scare and sachin vaze: अतिरेकी बॉम्ब ठेवतात हे ऐकलं होतं, पोलीस स्फोटकं ठेवतात हे पहिल्यांदा ऐकलं. ही गोष्ट क्षुल्लक नसल्याचं राज ठाकरे म्हणाले.
मुंबई: मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली आहे. देशमुख यांनी सचिन वाझेंना (Sachin Vaze) दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा सनसनाटी आरोप करणारं पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) लिहिलं आहे. यामुळे देशमुख यांच्यासह ठाकरे सरकारदेखील अडचणीत आलं असून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.
वाझे हा उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती; केंद्रानं चौकशी करावी- राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण (Mukesh Ambani Security Scare) आणि त्यातील सचिन वाझेंच्या (Sachin Vaze) सहभागावरून सरकारवर तोफ डागली आहे. 'अतिरेकी बॉम्ब, स्फोटकं ठेवतात हे आपण ऐकलं आहे. पण पोलीसच स्फोटकं ठेवतात हे आपण पहिल्यांदाच ऐकत आहोत. त्यामुळे ही गोष्ट वाटते तितकी क्षुल्लक नाही,' असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. केंद्रानं या प्रकरणाची चौकशी करावी. ही चौकशी नीट न झाल्यास हा देश अराजकाकडे जाईल, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला.
वाझे वर्षा बंगल्यावर वास्तव्यास होते; भाजपा खासदार नारायण राणेंचा खळबळजनक आरोप
उद्योगपती मुकेश अंबानींकडून खंडणी उकळण्यासाठी स्फोटकं ठेवण्याचा कट रचण्यात आला ही थिअरी चुकीची असल्याचा दावा राज यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुकेश अंबानी यांचे संबंध अतिशय चांगले आहेत. उद्धव यांच्या शपथविधीला अंबानी परिवारासह उपस्थित होते. आता तेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पोलीस अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याचं धाडस करणार नाहीत. त्यामुळे हे कोणाच्यातरी सांगण्यावरून झालं असावं, अशी शंका त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरेंनी उपस्थित केलेले १० महत्त्वाचे प्रश्न-
१. गृहमंत्री अनिल देशमुखांनी एकट्या वाझेंना १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. हे एकट्या मुंबईचं झालं. राज्यात एकूण शहरं किती? तिथले आयुक्त किती? त्यांचं टार्गेट किती?
२. परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून का हटवण्यात आलं? यामागचं कारण सरकार कधी सांगणार?
३. परमबीर सिंग यांचाही यामध्ये सहभाग होता, म्हणून त्यांना काढलं असलं तर मग त्यांची चौकशी का केली नाही? बदलीतून काय साध्य होणार?
४. मुकेश अंबानींच्या घराजवळ ठेवण्यात आलेल्या गाडीमधील जिलेटिन आलं कुठून?
५. मुकेश अंबानी आणि उद्धव ठाकरेंचे मधूर संबंध असताना आणि ही गोष्ट जगजाहीर असताना पोलीस दलातील कोणीही अधिकारी स्फोटकं ठेवण्याची हिंमत करेल का?
६. पोलीस अधिकारीच स्फोटकं ठेवत असल्याची घटना अत्यंत गंभीर. यासाठी वरून आदेश लागतात. ते कोणी दिले? कोणी सांगितल्याशिवाय वाझेंनी स्फोटकं ठेवणं शक्य नाही. त्यांना सूचना देणारी व्यक्ती कोण?
७. मुकेश अंबानींच्या घराजवळ चोख बंदोबस्त असतो. एखादी व्यक्ती दोनदा तिथून गेली तरी चौकशी होते. मग एक गाडी २४ तास तिथे कशी काय उभी होती?
८. मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या कारमध्ये धमकीचं पत्र होतं. त्यात नीता भाभी, मुकेश भैय्या असा उल्लेख होता. धमकी देणाऱ्याला कधी कोणी आदर देतं का?
९. मुकेश अंबानी यांच्याकडून पैसे काढणं इतकं सोपं आहे का? त्यांच्या सुरक्षेत इस्रायली लोक तैनात असताना, मध्य प्रदेश पोलिसांचं त्यांना संरक्षण असताना असं धाडस कोण करेल?
१०. अंबानींच्या घराजवळ गाडी कशी ठेवली गेली? ती कोणाच्या सांगण्यावरून ठेवली गेली?