मुंबई: माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, या संभाजी भिडेंच्या अजब विधानावर आता मनसेप्रमुख राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या व्यंगचित्रात दोन महिला दाखवल्या आहेत. त्यातील एका महिलेच्या हातात व्यंगचित्र दाखवण्यात आलं. या बाळाच्या चेहऱ्याऐवजी राज यांनी आंबा दाखवला आहे. या बाळाला पाहून दुसरी महिला 'अय्या ! भिडेंच्या बागेतून वाटतं,' असं म्हणत असल्याचं व्यंगचित्र राज यांनी रेखाटलं आहे. सध्या फेसबुकवर या व्यंगचित्राची मोठी चर्चा आहे.
माझ्या बागेतील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असं अजब विधान शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केलं होतं. रविवारी संभाजी भिडे यांची नाशिक येथे सभा झाली होती. यावेळी भिडे यांनी म्हटलं की, माझ्या शेतातील आंबा खाल्लास अपत्यप्राप्ती होते. आतापर्यंत १८०हून अधिक जोडप्यांना मी हा आंबा दिला. त्यातील दीडशे जणांना अपत्यप्राप्ती झाली असल्याचा दावा भिडे यांनी केला. आपल्या शेतातील आंब्यामुळे अपत्यप्राप्ती होते ही बाब फक्त आईलाच सांगितली होती. आता तुम्हाला सांगत असल्याचे भिडे यांनी सभेत म्हटले. सोशल मीडियावर याचे पडसाद उमटले होते. अनेकांनी संभाजी भिडेंच्या विधानाची खिल्ली उडवली होती.