Join us

Raj Thackeray MNS Padwa Melava: “महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राज ठाकरे”; मनसेची बॅनरबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 10:22 AM

गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसेकडून शिवाजी पार्क, सेना भवन परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत.

Raj Thackeray MNS Padwa Melava: मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा राज्यभर साजरा होत आहे. यानिमित्ताने राज ठाकरेंची सभा आहे. शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून शिवाजी पार्क, सेनाभवन परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे या आशयाचे बॅनर सेनाभवना समोर लावण्यात आले आहेत.

दादर उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरबाजीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क येथे होत आहे. या मेळाव्याचा टीझर जारी करण्यात आला होता. याआधी ९ मार्च रोजी मनसेच्या वर्धापनदिनी झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी सविस्तर राजकीय भाष्य करणे टाळले होते. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात आपण सविस्तर राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे पाडवा मेळाव्यात राज ठाकरे कुणाकुणावर निशाणा साधणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडाच्या पार्श्वभूमीवरही राज ठाकरे काही भाष्य करतात का, याकडेही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

यंदाचा मनसेचा पाडवा मेळावा लक्षवेधी ठरणार 

गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांची जाहीर सभा त्याच शिवाजी पार्कवर होते. त्यामुळे, आता, मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार, कोणावर निशाणा साधणार, पुढील दिशा काय ठरवणार हे ऐकण्यासाठी महाराष्ट्राची जनता उत्सुक आहे. तत्पूर्वी राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच मनसेकडून टीझर रिलीज करण्यात आले. यंदाचा मनसेचा पाडवा मेळावा लक्षवेधी ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान मनसेने शेअर केलेल्या टीझरमध्ये मशिदींवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला. तर, बाळासाहेबांचे स्वप्न राज ठाकरेंनी पूर्ण केल्याचेही या व्हिडिओत म्हटले होते. मशिदींची मुजोरी संपवावी... असे म्हणत मनसेचा हा टीझर रिलीज केला होता. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :राज ठाकरेमनसेमनसे गुढीपाडवा मेळावा