मोदींना आत्ताच आंबेडकर आठवले का?; राज ठाकरेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2018 10:44 PM2018-04-15T22:44:22+5:302018-04-15T22:44:22+5:30
राज ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आत्ता बाबासाहेब आंबेडकर आठवले का? असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरेंनी उपस्थित केला. 4 वर्षांमध्ये मोदींना बाबासाहेबांची आठवण झाली नाही. मग आत्ताच कसे काय बाबासाहेब आंबेडकर आठवले? मी आंबेडकरांमुळे पंतप्रधान झालो, असं मोदी सांगतात. पंतप्रधान पदाची शपथ घेताना बाबासाहेब नाही आठवले का?, असे प्रश्न राज यांनी उपस्थित केले. ते मुंबईच्या मुलुंडमध्ये झालेल्या सभेत बोलत होते.
भाजपकडून पाकिस्तान प्रश्नावर केल्या जाणाऱ्या राजकारणाचाही राज ठाकरेंनी यावेळी समाचार घेतला. 'भाजपकडून कायम पाकिस्तानच्या मुद्यावर राजकारण केलं जातं. मग परदेशातून भारतात परतणारे मोदी वाट वाकडी करुन नवाझ शरीफ यांना भेटायला कसे काय जातात?', अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी मोदींच्या पाकिस्तान दौऱ्यावर शरसंधान साधलं. कठुआ प्रकरणावरुनही राज ठाकरेंनी भाजपवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. 'भाजप बलात्काऱ्यांना पाठिशी घालतो. त्यांना लाज वाटत नाही का?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'आधी बलात्काराच्या घटना उजेडात आल्यावर स्मृती इराणी तेव्हाच्या पंतप्रधानांना बांगड्या पाठवायच्या. आता त्यांनी बांगड्या घालणं सोडून दिलं का?', असे म्हणत त्यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला.
'नाणारमधील प्रकल्पामुळे कोकणाचं नुकसान होईल. त्यामुळेच कोकणवासी या प्रकल्पाविरोधात आहेत. मात्र फक्त पैशांसाठी या भागात जमिनी खरेदी करणाऱ्या लोकांना हा प्रकल्प हवा आहे. प्रकल्पासाठी जमिनी विकून पैसा कमावता यावा, यासाठी नाणारमध्ये भाजप नेत्यांच्या नातेवाईकांनी जमिनी खरेदी केल्या आहेत,' असा थेट आरोप राज यांनी केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. 'नाणार प्रकल्पाला विरोध केल्यास हा प्रकल्प गुजरातमध्ये जाईल, अशी भीती मुख्यमंत्री दाखवतात. याचा अर्थ सगळं काही वरच्या पातळीवर ठरलेलं आहे. देशात गुजरातसोडून इतर राज्यं नाहीत का?' असा सवाल राज यांनी उपस्थित केला.