राज ठाकरेंना समजली 'अंदर की बात'; बघा, 'मातोश्री'त उद्धव-शहांमध्ये काय घडलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 05:47 PM2018-06-08T17:47:36+5:302018-06-08T17:54:01+5:30
अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर राज यांचा व्यंगचित्रातून निशाणा
मुंबई: भाजपा अध्यक्ष अमित शहांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर घेतलेल्या भेटीची चर्चा दोन दिवसानंतरही राजकीय वर्तुळात सुरू आहे. या भेटीनंतर शिवसेना आणि भाजपा पुढील लोकसभा निवडणुकीत एकत्र लढणार, अशी शक्यता काही राजकीय विश्लेषक व्यक्त करत असताना शिवसेनेचे नेते मात्र स्वबळावर ठाम आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या भेटीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून निशाणा साधला. मातोश्रीवरील दोन्ही नेत्यांची भेट 'तुझ्या गळा माझ्या गळा' वाटत असली, तरी प्रत्यक्षात हे दोन्ही नेते एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसत असल्याचं व्यंगचित्र राज ठाकरेंनी रेखाटलं आहे.
राज ठाकरेंनी 'भेट आणि मन की बात' अशा शीर्षकाखाली एक व्यंगचित्र त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गळाभेट घेताना दिसत आहेत. या दोघांनी आपापला एक हात एकमेकांच्या पाठीवर ठेवला आहे. तर दोघांच्या दुसऱ्या हातात खंजीर आहे. हा खंजीर ते एकमेकांच्या पाठीत खुपसण्याच्या तयारीत असल्याचं राज यांनी व्यंगचित्रातून दाखवलं आहे. राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेऊ, सत्तेतून बाहेर पडू, अशी धमकी वारंवार देणाऱ्या उद्धव यांची राज यांनी या व्यंगचित्रातून खिल्ली उडवली आहे. राज यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात उद्धव यांच्या खिशात राजीनामे दाखवण्यात आले आहेत.