मुंबई: कोणत्याही परिस्थितीत नाणारमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही, असं मनसेप्रमुख राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. नाणारमधील प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. त्याठिकाणी जमिनी विकत घेतलेल्या बाहेरच्या लोकांना हा प्रकल्प आहे. केवळ पैसा कमवण्यासाठी नाणार आणि परिसरात भाजप नेत्यांच्या नातेवाईकांनी जमिनी खरेदी केल्याचा घणाघाती आरोपदेखील राज यांनी केली. ते मुंबईच्या मुलुंडमध्ये बोलत होते. 'नाणारमधील प्रकल्पामुळे कोकणाचं नुकसान होईल. त्यामुळेच कोकणवासी या प्रकल्पाविरोधात आहेत. मात्र फक्त पैशांसाठी या भागात जमिनी खरेदी करणाऱ्या लोकांना हा प्रकल्प हवा आहे. प्रकल्पासाठी जमिनी विकून पैसा कमावता यावा, यासाठी नाणारमध्ये भाजप नेत्यांच्या नातेवाईकांनी जमिनी खरेदी केल्या आहेत,' असा थेट आरोप राज यांनी केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. 'नाणार प्रकल्पाला विरोध केल्यास हा प्रकल्प गुजरातमध्ये जाईल, अशी भीती मुख्यमंत्री दाखवतात. याचा अर्थ सगळं काही वरच्या पातळीवर ठरलेलं आहे. देशात गुजरातसोडून इतर राज्यं नाहीत का?' असा सवाल राज यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री राज्यातील जनतेला धादांत खोटी माहिती देतात, अशी टीकाही राज यांनी केली. 'महाराष्ट्राच्या जमिनीचं वेगानं वाळवंट होतं आहे. मराठवाड्यात कित्येक फूट खणूनही पाणी मिळत नाही. राजस्थाननंतर सर्वात वाईट स्थिती महाराष्ट्राची आहे. राज्यातील जमिनीच्या वाळवंटीकरणाची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. जमिनीत पाणीच नाही आणि मुख्यमंत्री आम्ही 1 लाख विहिरी खणल्याची माहिती सांगत फिरतात,' असं म्हणत राज ठाकरे मुख्यमंत्र्यांवर बरसले.
Live Updates:
* महाराष्ट्रातून शेतमाल विकण्यासाठी मुंबईत आलेल्या शेतकऱ्यांविरोधात शिवसेनेचा नगरसेवक तक्रार करतो- राज
* महाराष्ट्रात पाणी नाही आणि मुख्यमंत्री सांगतात आम्ही 1 लाख विहिरी बांधल्या- राज
* महाराष्ट्राचं वेगानं वाळवंटीकरण होतंय- राज
* नाणारमध्ये सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांनी जमिनी घेतल्या आहेत- राज
* नाणारचा प्रकल्प होऊ देणार नाही- राज
* तेव्हा पंतप्रधानांना बांगड्या पाठवणाऱ्या स्मृती इराणी कुठे आहेत?- राज
* बलात्काराकडे हिंदू, मुस्लिम नजरेनं कसं काय पाहता? - राज
* आधी राहुलला पप्पू म्हणायचे, गुजरात निवडणुकीनंतर गप्प बसले- राज
* बाबासाहेब आंबेडकर मोदींना आज आठवले का?- राज
* भाजप बलात्काऱ्यांच्या पाठिशी उभा राहतो; कठुवा बलात्कार प्रकरणावरुन राज ठाकरेंची टीका
* मनसेमुळे मराठी मुलांना रेल्वेत नोकऱ्या मिळाल्या- राज
* मनसेमुळे स्थानिक भाषेत रेल्वेच्या परीक्षा होऊ लागल्या- राज
* भाजप, शिवसेना सरकारसारख्या थापा मारत नाही- राज* कोणतीही सत्ता नसताना महिलांना रोजगार देतोय- राज* मनसेकडून महिलांना रिक्षांचं वाटप