मुंबई: शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या किसान मोर्चाला शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला. राज यांनी किसान सभेचे सचिव अजित नवले यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी त्यांनी किसान मोर्चाला आपला पाठिंबा असल्याचे कळवले. त्यामुळे आता हा मोर्चा मुंबईत आल्यानंतर त्यामध्ये मनसेचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. उद्या हा मोर्चा ठाण्यात प्रवेश करेल. त्यावेळीही मनसेकडून शेतकऱ्यांचे स्वागत करण्यात येईल. तत्पूर्वी शिवसेनेनेही किसान मोर्चाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनीही अजित नवलेंची भेट घेऊन त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे सांगितले. कोणत्याही अटींशिवाय कर्जमाफी, शेतमालासाठी योग्य भाव या आणि अशा अनेक मागण्या घेऊन नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर म्हणजेच भिवंडीत येऊन धडकला आहे. या मोर्चात हजारो शेतकऱ्यांचा समावेश आहे. १२ तारखेला हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे. आज या मोर्चातील शेतकऱ्यांचा मुक्काम भिवंडीत असणार आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या?
* संपूर्ण कर्जमाफी हवी.* वनजमिनी भूमिहीन आदिवासींच्या मालकीची व्हावी.* वृद्धापकाळात शेतकऱ्यांना निवृत्ती पेन्शन योजना लागू करावी.* गुजरात राज्याच्या फायद्याचा नद्याजोड प्रकल्प रद्द करावा.* सर्व शेतकऱ्यांना नवीन रेशनकार्ड द्यावीत.* प्रत्येक कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काचे घर मिळावे.* शेतकऱ्यांना चोवीस तास वीज, पाणी उपलब्ध व्हावे.